दर सेकंदाला डोकं चक्रावणारा सस्पेन्स; राधिका आपटेचा चित्रपट ओटीटीवर चर्चेत!
Saali Mohabbat On OTT: राधिका आपटे, दिव्येंदु शर्मा आणि अनुराग कश्यप यांचा हा टॉप रेटेड चित्रपट 'साली मोहब्बत' ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मनीष मल्होत्रा निर्मित हा डार्क ड्रामा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळेल.

55 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये प्रीमिअर झालेला ‘साली मोहब्बत’ (Saali Mohabbat) हा चित्रपट अखेर ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये नव्हे तर थेट ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट काही रोमँटिक किंवा अॅक्शन ड्रामा नाहीये, तर यात भरभरून गूढ, रहस्य, सस्पेन्स आणि थ्रिलरचा तडका आहे. या चित्रपटाची कथा इतकी दमदार आहे की तुम्ही पूर्णवेळ खुर्चीला खिळून राहता. राधिका आपटे, दिव्येंदु शर्मा आणि अनुराग कश्यप यांचा हा चित्रपट IFFI मध्ये प्रीमिअर झाल्याच्या एक वर्षानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे.
या चित्रपटाची कथा एका अशा महिलेच्या अवतीभवती फिरते, जी खोटारडेपणा, विश्वासघात आणि हत्येच्या जाळ्यात अडकली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री टिस्का चोप्राने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर मनीष मल्होत्रा आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘साली मोहब्बत’ या चित्रपटाची कथा स्मिताभोवती (राधिका आपटे) फिरते, जी फुरस्तगड नावाच्या एका छोट्या गावात राहणारी गृहिणी आहे. तिचं आयुष्य तसं तर चांगलंच चाललेलं असत. परंतु अचानक एकेदिवशी तिला तिच्या पतीकडून झालेल्या विश्वासघाताची जाणीव होते. त्यानंतर ती हळूहळू खोटारडेपणा, विश्वासघात, फसवणूक आणि हत्या यांच्या जाळ्यात अडकते. इथूनच खरा सस्पेन्स सुरू होतो. दोन टाइमलाइन्सवर या चित्रपटाची कथा बनली असून, ती ज्या पद्धतीने सादर करण्यात आली आहे, ते खरोखर पाहण्यासारखं आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात राधिका आपटेशिवाय दिव्येंदु शर्मा, अनुराग कश्यप, चाहत अरोरा, कुशा कपिला आणि शरत सक्सेना यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 12 डिसेंबर 2025 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर दिग्दर्शक म्हणून टिस्काचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी तिने ‘रुबरु’ या लघुपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘साली मोहब्बत’ या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच थरार आणि सस्पेन्सचं वातावरण निर्माण होतं. या कथेत अनेक रंजक आणि रोमांचक वळणं आहेत. सुरुवातीला साधी कथा वाटणारी नंतर पुढे अधिकाधिक गुंतागुंतीची होते. या चित्रपटाचा पहिला भाग थोडा संथ आहे, परंतु मध्यांतरानंतर कथा जोर धरते.
