‘सैयारा’ फेम अभिनेता दिवाळखोरीत, मुलाच्या शाळेबाहेर विकला भाजीपाला, केली शेती
'स्टुडंट ऑफ द इअर 2' या चित्रपटानंतर हा अभिनेता शेतीकडे वळला. परंतु शेतीतही त्याला यश मिळालं नाही. पाऊस आणि पुरामुळे शेतीचं पूर्ण नुकसान झालं होतं. त्यानंतर या अभिनेत्याच्या डोक्यावर खूप कर्ज होतं.

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या चित्रपटात रोसेशची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता राजेश कुमारने ‘सैयारा’ या चित्रपटातून दमदार पुनरागमन केलंय. अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 400 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. याच चित्रपटामुळे राजेशला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. लॉकडाऊननंतर तो अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरं गेला. त्याच्यावर दोन कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि त्याच्या बँक खात्यात फक्त 2500 रुपये शिल्लक होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजेश त्याच्या आर्थिक अडचणींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.
2019 मध्ये राजेशने अभिनयक्षेत्र सोडून शेती करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने पालघरमध्ये 20 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती. शेतीबद्दल राजेश खूप सकारात्मक होता आणि त्यातून बराच नफा कमावणार अशी त्याला आशा होती. परंतु पाऊस आणि खराब हवामानामुळे त्याच्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरलं. राजेशने लावलेली 15000 झाडं नष्ट झाली. यामुळे त्याला मोठा आर्थिक फटका बसला होता. “त्या परिसरात आधी कधीच पूर आला नव्हता, परंतु त्यावर्षी जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे माझ्या संपूर्ण शेतीचं नुकसान झालं होतं”, असं तो म्हणाला.
View this post on Instagram
राजेशच्या आयुष्यात एकानंतर एक आव्हानं येतच होती. कोविड महामारीमुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आली होती. त्यानंतर शेती करणंही कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत त्याच्याकडचे सर्व बचतीचे पैसेही संपुष्टात आले होते. कमाईचा कोणताही मार्ग त्याच्यासमोर उरला नव्हता. दिवळखोरीत असलेल्या राजेशच्या बँक खात्यात फक्त 2500 रुपये होते आणि त्यामुळे तो मुलांच्याही गरजा भागवू शकत नव्हता. अखेर राजेशने त्याच्या मुलाच्या शाळेबाहेर एक छोटं दुकान उघडलं होतं. परंतु त्यानंतरही त्याच्या आर्थिक समस्या संपल्या नव्हत्या. आता राजेश शेती आणि इतर छोटे-मोठे व्यवसाय सोडून अभियन क्षेत्राकडे परतला आहे. आर्थिक संकटाच्या काळात कुटुंबाने खूप साथ दिल्याचं त्याने सांगितलं. ‘सैय्यारा’ या चित्रपटाने त्याने अभिनेत्री अनित पड्डाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. राजेशने ‘मिसेस अँड मिस्टर शर्मा अलाहाबादवाले’, ‘बा बहु और बेबी’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
