“जरी दोघांनी…”; अरबाज-मलायकाच्या घटस्फोटाबद्दल त्यांच्याच मुलासमोर काय म्हणाला सलमान?
अभिनेता सलमान खानने पुतणा अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये सलमानने अरहान आणि त्याच्या मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याचप्रमाणे तो अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाविषयी व्यक्त झाला.

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खानने गेल्या वर्षी त्याच्या युट्यूब चॅनलवर ‘डंब बिर्याणी’ या नावाने पॉडकास्टची सुरुवात केली. या पॉडकास्टमध्ये आतापर्यंत त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र आता पहिल्यांदाच अरहानचा काका आणि अभिनेता सलमान खान या पॉडकास्टमध्ये दिसणार आहे. हा एपिसोड युट्यूबवर प्रदर्शित झाला असून त्यात सलमान हा अरहान आणि त्याच्या मित्रांसोबत विविध मुद्द्यांवर मोकळेपणे गप्पा मारताना दिसतोय. यामध्ये तो भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाविषयीही व्यक्त झाला. त्याचप्रमाणे पुतण्याला मोलाचा सल्लासुद्धा दिला.
पॉडकास्टमध्ये विविध मुद्द्यांवरून गप्पा सुरू असताना अरहानच्या करिअरचा विषय निघाला. तेव्हा सलमानने त्याला विचारलं, “तुला पुढे जाऊन नेमकं काय करायचं आहे?” त्यावर अरहानचा एक मित्र उत्तर देतो, “त्याला रेस्टॉरंट सुरू करायचं आहे.” हे ऐकून सलमान अरहानला म्हणतो, “जर तुला रेस्टॉरंटच सुरू करायचं असेल तर मग फाइटिंग, जिम्नॅस्टिक्स यांसारखे क्लासेस का लावले? रेस्टॉरंटसाठी तू या गोष्टी शिकलास का?”




गप्पांच्या ओघात पुढे सलमान पुतण्याला रिलेशनशिपबद्दल महत्त्वपूर्ण सल्ला दितो. “तुम्ही कितीही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिलात तरी ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं वाटेल, तेव्हा 30 सेकंदांपेक्षाही कमी वेळात त्या व्यक्तीला सोडण्याची आणि पुढे निघून जाण्याची ताकद तुमच्यात असायला हवी”, असं तो सांगतो.
View this post on Instagram
यावेळी सलमान त्याचा भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. अरहानकडे इशारा करत तो म्हणाला, “या मुलाने अनेक चढउतारांचा सामना केला आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर तुलाच तुझं सर्व काही करायचं आहे. एकेदिवशी तुझं स्वत:चं एक कुटुंब असेल. तुझं स्वत:चं कुटुंब असण्यासाठी तुला यावर काम करावं लागेल. कुटुंबीयांसोबत मिळून लंच आणि डिनर (जेवण) करण्याची संस्कृती नेहमी असायला हवी आणि एक कुटुंबप्रमुखसुद्धा असायला हवा, ज्यांचा तुम्ही आदर कराल.”
अरबाज आणि मलायकाने 1998 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2002 मध्ये अरहानचा जन्म झाला. 2017 मध्ये अरबाज आणि मलायका विभक्त झाले. त्यानंतर मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली होती. मात्र आता या दोघांचाही ब्रेकअप झाला आहे. तर दुसरीकडे अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलंय.