Salman Khan | सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा; सुपरस्टारबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत
सोमीने सलमानवर आरोप करायची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने सोशल मीडियाद्वारे सलमानवर खळबळजनक आरोप केले होते. मात्र नंतर तिने हे पोस्ट डिलिट केले.

मुंबई : अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा सोशल मीडियावरील तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नव्वदच्या दशकात सोमीने इंडस्ट्रीत नाव कमावलं. मात्र त्यानंतर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर परदेशात स्थायिक झाली. अभिनेता सलमान खानसोबत तिचं अनेकदा नाव जोडलं गेलं. इतकंच नव्हे तर सोमी अलीमुळेच सलमानचं अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत होणारं लग्न मोडलं, असंही म्हटलं जातं. सोमीने गेल्या काही वर्षांत वारंवार सलमानवर अनेक आरोप केले. आता पुन्हा एकदा तिने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने शोषण करणाऱ्या एका व्यक्तीबद्दल लिहिलं आहे.
सोमीने सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओद्वारे अपमानकारक नात्यांविषयी भाष्य केलं आहे. या पोस्टमध्ये तिने एक्स बॉयफ्रेंड सलमान खानचंही नाव घेतलं आहे. सोमीने लिहिलेल्या पोस्टमधील हॅशटॅगमध्ये सलमान खान, जिया खान, बिल कॉस्बी आणि हार्वे विन्स्टीन यांचा उल्लेख आहे. इतकंच नव्हे तर ही पोस्ट हटवण्यासाठी तिच्यावर दबाव असल्याचाही खुलासा तिने केला आहे.




सोमी अलीची पोस्ट-
सोमीने लिहिलं, ‘मला पोस्ट हटवण्यास सांगितलं जाईल. माझ्या विवेकबुद्धीवर प्रश्न उपस्थित केले जातील. मला दारू पिण्याची समस्या असल्याचं म्हटलं जाईल. तरीसुद्धा मी थांबणार नाही. कारण तुम्ही त्या पद्धतीचा अपमान आणि त्रासाला सामोरं गेला नाहीत. कोणीच तुमची बाजू घेतली नाही कारण तुमचं शोषण करणाराच मोठा स्टार आहे आणि तुम्ही त्याचे मित्र आहात. तो तुमचं करिअर बनवू किंवा बिघडवू शकतो. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींवर विश्वास केला की ते साथ देतील. अनेकदा त्यांना याविषयी सांगितलं गेलं आणि त्यांनीसुद्धा प्रत्यक्ष डोळ्याने हे सर्व होताना पाहिलं’
View this post on Instagram
सोमीने या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ‘एका व्यक्तीने शोषण करणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्तीला प्रेमळ असल्याचं म्हटलं होतं. लक्षात ठेवा मी अशा अभिनेत्याचा उल्लेख करतेय, ज्याच्यासाठी माझ्या मनात फार आदर आहे. याप्रकरणी तुम्ही कधी मला गप्प करू शकत नाही. या सर्व गोष्टींचा एकेदिवशी शेवट नक्की होईल. एखाद्या भयपटाप्रमाणे याचा शेवट आनंदी असेल.’
सोमीने हे नक्की कोणाबद्दल आणि कशामुळे लिहिलं हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र तिने सलमानवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. सोमीने सलमानवर आरोप करायची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने सोशल मीडियाद्वारे सलमानवर खळबळजनक आरोप केले होते. मात्र नंतर तिने हे पोस्ट डिलिट केले.