Salman Khan : ‘माझ्या आयुष्यात असं बरच काही आहे की, ज्यामुळे इतरांची प्रतिष्ठा धुळीस मिळेल’, बायोपिकच्या प्रश्नावर सलमान खानचं उत्तर
Salman Khan : 'मातृभूमी' चित्रपट बायोपिक आहे का? त्यावर सलमान खानने गलवान खोऱ्यातील संघर्ष या चित्रपटामागची प्रेरणा असल्याचं सांगितलं. हीच चर्चा पुढे सलमानच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्यापर्यंत गेली.

बॉलिवूडमध्ये सलमान खानचं एक वेगळं स्थान आहे. विषय कुठलाही असो त्यात सलमान खानचं नाव जोडलं गेलं की, आपोआप प्रसिद्धी मिळते. बॉलिवूडचा हा दबंग सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी’ मुळे चर्चेत आहे. गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये जो संघर्ष झाला, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मीडियाशी बोलताना सलमान खान त्याच्या आयुष्यावरील बायोपिकच्या मुद्याबद्दल बोलला. ‘मातृभूमी’ चं कथानक बदलण्यासाठी सरकारने दबाव टाकल्याच्या अफवा सुद्धा त्याने फेटाळून लावल्या. अंधेरी पश्चिमेला शुक्रवारी ‘मातृभूमी’ चित्रपटाच्या एका विशेष कार्यक्रमासाठी सलमान खान उपस्थित होता. या चित्रपटातील सहकलाकार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘मातृभूमी’ चित्रपट बायोपिक आहे का? त्यावर सलमान खानने गलवान खोऱ्यातील संघर्ष या चित्रपटामागची प्रेरणा असल्याचं सांगितलं. हीच चर्चा पुढे सलमानच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्यापर्यंत गेली. “माझ्या आयुष्यात असं काही नाहीय की, ज्यामुळे एखादा चित्रपट सुपरहिट होईल. पण माझ्या आयुष्यात असं बरच काही आहे की, ज्यामुळे इतरांची प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते” असं सलमान या चर्चेला उत्तर देताना म्हणाला.
गस्त घालण्यावरुन वादाची सुरुवात
‘मातृभूमी’ चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यासाठी सरकारने दबाव टाकल्याचा दावाही त्याने फेटाळून लावला. ‘मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस’ हे त्या चित्रपटाचं नाव आहे. आधी ‘गलवान’ असं या चित्रपटाचं नाव होतं. भारतात कोविड-19 ची पहिली लाट असताना 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे काही जवान शहीद झाले होते. भारत-चीनमध्ये सीमारेषेवरुन वाद आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान खोरं आहे. गस्त घालण्यावरुन या सर्व वादाला सुरुवात झालेली.
अतिरिक्त कुमक सीमेवर पाठवलेली
भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्याचवेळी चीनच्या बाजूला सुद्धा मोठं नुकसान झालं होतं. मागच्या चार दशकातील भारत-चीनमधील हा मोठा संघर्ष होता. त्यामुळे दोन्ही बाजूला तणाव वाढलेला. भारताने सैनिकांची अतिरिक्त कुमक सीमेवर पाठवलेली. संघर्ष अजून वाढू नये यासाठी दोन्ही बाजूकडून डिप्लोमॅटिक चर्चा सुरु झालेली.
