Mumbai Local Mega Block: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे होणार ‘मेगा’ हाल; पहा लोकलचे वेळापत्रक
उद्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तुम्ही बाहेर पडणार असाल तर आधीच मुंबई लोकलच्या रविवारच्या मेगा ब्लॉकबद्दल जाणून घ्या. नेमक्या कुठे ट्रेन थांबणार आणि कुठे नाही याबद्दल जाणून घ्या.

जर तुम्ही रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या रविवारी तुम्ही घराबाहेर पडण्यापूर्वी ट्रेनचे वेळापत्रक नक्की तपासा. कारण रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला दिवाळीच्या पहिल्या दिवशी कुठे जायचा प्लॅन करायचा असेल तर मुंबई लोकलचे वेळापत्रक आधीच तपासा. मेगा ब्लॉकच्या काळात रुळांची दुरुस्ती आणि देखभालीचे काम केले जाणार आहे, ज्यामुळे अनेक लोकल गाड्यांना विलंब होऊ शकतो, तर काही सेवा पूर्णपणे रद्द केल्या जातील. नेमका कुठे आणि कसा ब्लॉक असणार आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.
मेन लाईनवर मेगा ब्लॉक कधी असेल?
माटुंगा आणि मुलुंड दरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ स्लो लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकची वेळ सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत असेल. या कालावधीत, सकाळी १०:१४ ते दुपारी ३:३२ दरम्यान सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या ‘डाऊन’ स्लो लोकल गाड्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान फास्ट लाईनवरून वळवण्यात येतील.
कोणत्या स्थानकावर थांबणार गाड्या?
गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि त्यानंतर पुन्हा स्लो लाईनवर परततील. प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे १५ मिनिटांचा विलंब होऊ शकतो.
दरम्यान, ठाण्यावरून सकाळी ११:०७ ते दुपारी ३:५१ या वेळेत सुटणाऱ्या ‘अप’ अर्थात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकल गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान ‘अप’ जलद मार्गावरून वळवण्यात येतील. या गाड्या भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा येथे पुन्हा धिम्या मार्गावर परततील.
हार्बर मार्गांवर काय बदल असतील?
हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी या स्थानकादरम्यान दरम्यान, ‘अप’ आणि ‘डाऊन’ अशा दोन्ही मार्गांवर सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ या वेळेत ‘मेगा ब्लॉक’ असेल. या कालावधीत, सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ दरम्यान पनवेलवरून सीएसएमटी कडे जाणाऱ्या ‘अप’ लोकल सेवा रद्द राहतील. त्याचप्रमाणे, सकाळी ९:४५ ते दुपारी ३:१२ दरम्यान सीएसएमटीवरून बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ‘डाऊन’ लोकल सेवाही बंद राहतील.
ट्रान्स-हार्बर मार्गावर काय स्थिती असणार?
ट्रान्स-हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक असणार आहे यामुळे काही लोकल सेवाही रद्द राहतील. ट्रान्स-हार्बर मार्गावरावरील ब्लॉकदरम्यान, पनवेल ते ठाणे दरम्यान धावणाऱ्या ‘अप’ दिशेच्या गाड्या (सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ दरम्यानच्या) आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या ‘डाउन’ दिशेच्या गाड्या (सकाळी १०:०१ ते दुपारी ३:२० दरम्यानच्या) बंद राहतील.
