रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मीडिया ट्रायल थांबवण्याची रियाची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वतीने सीबीआयकडे चौकशी सुपूर्द केली तर आपला कोणताही आक्षेप नाही, असेही रिया चक्रवर्तीने म्हटले आहे

रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मीडिया ट्रायल थांबवण्याची रियाची मागणी

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तसेच महाराष्ट्र व बिहार सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. रिया, तिचे वडील आणि भाऊ यांची काल ईडी कार्यालयात जवळपास दहा तास चौकशी झाली. (SC Hearing on Sushant Singh Rajput Case Rhea Chakraborty Petition)

सुनावणीपूर्वी रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली आहे, ज्यात तिने माध्यमांकडून होणारी सुनावणी (मीडिया ट्रायल) थांबवण्याची मागणी केली आहे. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास सुनावणी सुरु होईल.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी कोण करणार, याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. बिहार सरकारच्या शिफारशीनंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याला महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्ती यांनी विरोध दर्शवला आहे.

सीबीआयने दाखल केलेला खटलाही मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना सुशांतच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल मागितला होता. ते पाहिल्यानंतर आणि सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोणाकडून तपास होईल हे न्यायालय ठरवू शकते.

रिया चक्रवर्तीचे प्रतिज्ञापत्र

रिया चक्रवर्तीने आज सुनावणी होण्यापूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. पाटण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी कोणताही आधार नाही. ही केस मुंबई पोलिसांकडे ट्रान्स्फर होऊ नये म्हणून सीबीआयकडे तपास देण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय हे करता येणार नाही, असे रियाचे म्हणणे आहे. मात्र तिने असेही म्हटले आहे की जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वतीने सीबीआयकडे चौकशी सुपूर्द केली तर आपला कोणताही आक्षेप नाही.

सीबीआय आणि ईडीच्या कार्यप्रणालीवरही रियाने प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, की पाटण्यात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने सुशांतच्या बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरु केली. दुसरीकडे सीबीआयनेही त्वरित गुन्हा दाखल केला. मात्र बरीच मोठी प्रकरणे आहेत, ज्यांचा तपास या एजन्सीज करत नाहीत. मात्र यावेळी दोघेही विद्युतवेगाने कामाला लागले.

“मी मीडिया ट्रायलची शिकार”

प्रतिज्ञापत्रात संपूर्ण प्रकरणाच्या मीडिया ट्रायलचाही तिने उल्लेख केला आहे. मीडियाने आपल्याला आधीच दोषी ठरवले आहे. पहिल्या टूजी आणि आरुशी तलवार प्रकरणात ज्यांना मीडियाच्या वतीने दोषी ठरवण्यात आले होते, ते निर्दोष ठरले होते. सुशांतनंतरही काही कलाकारांनी आत्महत्या केली आहेत, पण माध्यमांना या प्रकरणातच रस आहे. या प्रकरणात अतिशयोक्ती केली जात आहे. मी सुरुवातीपासूनच अस्वस्थ आहे, आणि आता आपले वैयक्तिक आयुष्य एक तमाशा बनले आहे, असे रियाने म्हटले आहे.

राजकारणाचा बळी ठरल्याचाही दावा

रियाने स्वत:ला राजकारणाचा बळी ठरवले आहे. “बिहारमध्ये निवडणुका तोंडावर असल्याने यात राजकीय चढाओढ सुरु आहे. खुद्द बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या प्रकरणात रस दाखवला. यानंतर सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पाटणा पोलिसांनी एफआयआर नोंदवला. कायद्यानुसार पाटणा पोलिसांना तसे करण्याचा अधिकार नव्हता” असा दावाही रियाने केला आहे.

रिया चक्रवर्तीने सर्वप्रथम या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पाटण्यात नोंदवलेली एफआयआर मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी तिने केली होती. नंतर बिहार सरकारच्या सूचनेवरून पाटण्यात नोंदवलेली एफआयआर सीबीआयकडे सोपवण्यात आली.

महाराष्ट्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात सीबीआयला चौकशी सोपवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने दाखल केलेला एफआयआर मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात वर्ग करावा अशी मागणी राज्याने केली आहे. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

(SC Hearing on Sushant Singh Rajput Case Rhea Chakraborty Petition)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *