SRK, Aamir Khan: एक दिवसाचा मुख्यमंत्री बनू शकले असते शाहरुख-आमिर; फक्त या कारणासाठी नाकारली संधी
Aamir Khan and Shah Rukh Khan: एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची ऑफर मिळाली तर काय होईल? अशीच एक ऑफर शाहरुख खान आणि आमिर खान यांना देण्यात आली होती. परंतु दोघांनीही ती ऑफर नाकारली. जाणून घ्या, नेमकं काय घडलं..

Aamir Khan and Shah Rukh Khan: आमिर खान आणि शाहरुख खान हे हिंदी सिनेसृष्टीतील मोठे कलाकार आहेत. एकीकडे आमिरकडे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटाचा किताब आहे, तर दुसरीकडे शाहरुखच्या नावावरही 1000 कोटींच्या कमाईचे दोन चित्रपट आहेत. शाहरुखला बॉलिवूडचा किंग म्हटलं जातं. तर आमिर हा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. हे दोघं एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेत. परंतु 24 वर्षांपूर्वी या दोघांना एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची संधी देण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे दोघांनीही ही संधी नाकारली.
24 वर्षांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नायक : द रियल हिरो’ या चित्रपटाशी संबंधित हा किस्सा आहे. या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर आणि राणी मुखर्जी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ‘नायक’ला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता आणि आजही टीव्हीवर तो आवडीने पाहिला जातो. परंतु या चित्रपटातील भूमिकेसाठी अनिल कपूर हे निर्मात्यांची पहिली पसंत नव्हते. खुद्द अनिल कपूर यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे या गोष्टीचा खुलासा केला होता.
‘नायक : द रियल हिरो’ हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अमरिश पुरी यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. हा एक पॉलिटिकल ड्रामा होता. एस. शंकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुदलवन’ या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. 7 सप्टेंबर रोजी जेव्हा या चित्रपटाला 24 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा अनिल कपूर यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की या चित्रपटाची पहिली ऑफर शाहरुख आणि आमिर खान यांना देण्यात आली होती.
View this post on Instagram
जुना फोटो शेअर करत अनिल कपूर यांनी लिहिलं, ‘काही भूमिका तुम्हाला ओळख मिळवून देतात, नायकमधील भूमिका त्यापैकीच एक होती. आधी या चित्रपटाची ऑफर आमिर खान आणि शाहरुख खान यांना देण्यात आली होती. मला माहीत होतं की मला या भूमिकेला अक्षरश: जगायचं आहे. दिग्दर्शक शंकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांना आभाी आहे. मी नेहमीच शाहरुख खानने म्हटलेले शब्द लक्षात ठेवीन, जे त्याने स्टेजवर म्हटलं होतं, ‘ही भूमिका अनिलसाठीच बनली होती.’ असे क्षण कायम तुमच्या आठवणीत राहतात.’
24 वर्षांपूर्वी जेव्हा ‘नायक’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचसाठी पार्टी आयोजित करण्यात आली होती, तेव्हा तिथे शाहरुखसुद्धा उपस्थित होता. या चित्रपटाला त्याने नकार दिला असला तरी अनिल आणि राणी यांना त्याने पूर्ण पाठिंबा दिला होता. शाहरुखने म्हटलं होतं, “मी शूटिंग सोडून इथे पळून आलोय. यामागे दोन कारणं आहेत. माझा खास मित्र अनिल कपूरचा हा चित्रपट आहे आणि राणीसुद्धा इथे आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलोय.”
चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांना एका मुलाखतीत आमिर आणि शाहरुख यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी या चित्रपटाला होकार का दिला नाही, असं त्यांना विचारलं गेलं. त्यावर दिग्दर्शकांनी सांगितलं की आमिरसोबतच्या भेटीदरम्यान व्यवस्थित बोलणं होऊ शकलं नव्हतं. तो ‘मुदलवन’च्या कल्पनेनं फारसा प्रभावित झाला नव्हता. तर शाहरुख त्याच्या ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.
