‘सैय्यारा’ एवढा हिट का ठरतोय? आमिर खानने सांगितलं खरं कारण
'सैय्यारा' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये एवढी क्रेझ का आहे, यामागचं कारण आता अभिनेता आमिर खानने उलगडून सांगितलं आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट आहे.

अहान पांडे आणि अनित पड्डा या नव्या आणि फ्रेश जोडीने कमाल केली आहे. ‘सैय्यारा’ या त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: वादळ आणलं आहे. 18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 300 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. तरुण वर्गाला विशेषकरून हा चित्रपट अधिक आवडतोय. थिएटरमध्येही त्यांचीच गर्दी अधिक पहायला मिळतेय. प्रेक्षकांमध्ये ‘सैय्यारा’ची एवढी क्रेझ का आहे, असा प्रश्न अनेकांना पडतोय. त्यामागचं उत्तर आता बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खानने त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. आमिरच्या ‘सितारें जमीन पर’ या चित्रपटानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात तो ‘सैय्यारा’च्या यशाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.
“माझ्या मते वेगवेगळ्या पिढीचे लोक वेगवेगळ्या कंटेंटकडे आकर्षित होतात. कशा प्रकारचं कंटेंट आहे, हे पाहून ते त्याला महत्त्व देतात. मला असं वाटतं की आता तरुण पिढीला ‘सैय्यारा’ हा चित्रपट खूप आवडतोय, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतोय. प्रत्येक ग्रुपची एक विशेष टेस्ट (आवडनिवड) असते. एक क्रिएटिव्ह व्यक्ती म्हणून मलासुद्धा प्रत्येक प्रकारचे चित्रपट बनवायचे आहेत”, असं आमिर म्हणाला.
याविषयी त्याने पुढे सांगितलं, “मला जेन-झी (Gen Z) पिढीसाठीही चित्रपट बनवण्याची इच्छा आहे, तरुण वर्गासाठी चित्रपट बनवण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी मला विविध विषय निवडायचे आहेत. यामुळे मला तसं करण्याचं स्वातंत्र्य मिळतं.” अहान पांडे आणि अनित पड्डाच्या चित्रपटाच्या यशानंतर आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसकडून सोशल मीडियावर शुभेच्छा देणारी एक पोस्ट लिहिण्यात आली होती. ‘थिएटरमधील लक्षवेधी यशासाठी सैय्याराच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून शुभेच्छा. अहान पांडे आणि अनित पड्डा हे त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटातून विशेष चमकले आणि त्यांनी दमदार अभिनय केला. दिग्दर्शक मोहित सुरी ज्या गोष्टीसाठी ओळखता जातो, त्या खास गोष्टी या चित्रपटातून अधोरेखित झाल्या आहेत. हृदयाला भिडणाऱ्या या लव्हस्टोरीचं संपूर्ण श्रेय यशराज फिल्म्सला जातं’, असं त्यांनी लिहिलं होतं.
रोमँटिक थीम्स, नवे चेहरे, मनाला भिडणारं संगीत, अहान आणि अनित यांची केमिस्ट्री यांमुळे ‘सैय्यारा’ हा चित्रपट तरुण वर्गामध्ये विशेष लोकप्रिय ठरतोय. माऊथ पब्लिसिटीचा या चित्रपटाला खूप फायदा होत असून तरुण वर्गाची पावलं थिएटरकडे अधिक वळू लागली आहेत.
