Shah Rukh Khan: एवढा कसला ॲटिट्यूड? चाहत्याचा हात झटकल्याने शाहरुखवर संतापले नेटकरी
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका चाहत्याचं हात झटकताना दिसत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याची लोकप्रियता जगभरात आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. विमानतळ असो किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम, शाहरुखची झलक दिसताच चाहत्यांची गर्दी जमते. मात्र, सध्या शाहरुखचा असाच एक जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमानतळावर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याचा हात शाहरुखने झटकला होता. या व्हिडीओवरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली असून नेटकऱ्यांनी शाहरुखच्या वागण्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
ही घटना मे 2023 मधील आहे. शाहरुख खान त्यावेळी राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या काश्मीरमधील शूटिंगचं वेळापत्रक पूर्ण करून मुंबईत परतला होता. मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना त्याच्यासोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि सुरक्षारक्षक होते. विमानतळाबाहेर शाहरुखला पाहण्यासाठी चाहते आणि पापाराझींची गर्दी जमली होती. सुरुवातीला शाहरुख चाहत्यांच्या दिशेने हात हलवताना आणि फ्लाइंग किस देताना दिसला. मात्र, याचवेळी एका चाहत्याने त्याच्या जवळ येत अचानक मोबाईलमधून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. चाहत्याची ही कृती पाहताच शाहरुखने त्याचा हात बाजूला झटकला आणि तिथून पुढे निघून गेला. या घटनेचा व्हिडीओ त्यावेळीही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
जुन्या व्हिडीओची पुन्हा चर्चा
आता नोव्हेंबर 2026 मध्ये हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाल्यानंतर शाहरुखच्या वागण्यावरून सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. काही नेटकऱ्यांनी शाहरुखच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने, ‘एवढा कसला ॲटिट्यूड? चाहत्यांमुळेच तुम्ही आहात’, अशा शब्दांत टीका केली. तर काहींनी सेलिब्रिटींनी चाहत्यांशी नम्रपणे वागायला हवं, असं म्हटलं आहे. दुसरीकडे, अनेकांनी मात्र शाहरुखची बाजू घेतली आहे. ‘प्रत्येक वेळी सेल्फी देणं बंधनकारक नाही’, ‘कलाकारांनाही स्वतःची प्रायव्हसी असते’, ‘परवानगी न घेता कोणाच्याही अंगावर जाणं चुकीचं आहे’, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. एका युजरने तर सेल्फी काढण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घ्यायला हवी, असं मत व्यक्त केलं. यापूर्वीही या घटनेवर अशाच संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
विशेष म्हणजे, सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याचा आणि त्यांच्या वैयक्तिक अवकाशाचा आदर करण्याचा मुद्दाही या निमित्ताने चर्चेत आला आहे. शाहरुखचा बॉडीगार्ड युसूफ इब्राहिम याने जानेवारी 2025 मध्ये एका मुलाखतीत अशाच प्रसंगाचा उल्लेख करताना कलाकारांनाही वैयक्तिक वेळ फार कमी मिळतो, असं सांगितलं होतं. चाहत्यांनी फोटो काढण्यापूर्वी परवानगी घ्यावी आणि योग्य अंतर राखावं, असंही त्याने स्पष्ट केलं होतं.
