‘शाळा मराठी’ची जोरदार चर्चा; छत्रपती संभाजीनगरच्या या चिमुकल्या किर्तनकाराने गायलं गाणं
‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता त्यातील या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. मराठी शाळांची आठवणी जागं करणारं हे गाणं चिमुकल्या कीर्तनकाराने गायलं आहे.

मराठी माध्यमातील शाळांची संस्कारमूल्ये, त्या शाळांनी घडवलेली पिढी आणि शिक्षकांनी दिलेला अमूल्य वारसा ही सगळी शाळेची माया पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शाळा मराठी’ या धमाल गाण्यातून ते अनुभवायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमेनं ‘क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी’ असं म्हणत ‘द फोक आख्यान’च्या हर्ष-विजय आणि ईश्वरसोबत पाच दमदार गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यातील पहिलं ‘शाळा मराठी’ हे शाळेची आठवण जागं करणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
मराठी शाळेची ओळख, तिचं वातावरण, त्यातील आपुलकी, शिक्षकांचं प्रेम आणि शाळेच्या भिंतीतून मिळालेले संस्कार हे सर्वच या गाण्याच्या प्रत्येक ओळीतून जिवंत होतं. रोहित जाधवच्या दमदार आवाजास हर्ष–विजय यांचं संगीत आणि गीतकार ईश्वर अंधारे यांच्या मजेशीर शब्दांचा सुंदर मेळ यात अनुभवायला मिळतो. हे गाणं प्रत्येकाला नॉस्टॅलजिक करणारं आहे.
या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, ”’क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम‘मध्ये आम्ही मराठी माध्यमाच्या शाळांचं वास्तव, त्यांची जिद्द आणि त्यांच्यातील ऊर्जा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शाळा मराठी’ हे गाणं या चित्रपटाच्या आत्म्याला स्पर्श करणारं आहे. मराठी शाळांनी अनेक पिढ्या घडवल्या. त्यांचे संस्कार, मूल्य आणि ऊब या गीतात सजीव झाली आहे. 12 वर्षांच्या रोहित जाधवने या गाण्यात रंगत आणली आहे. रोहित हा छत्रपती संभाजीनगरचा असून गुरुवर्य अनाथाची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांच्या कीर्तन संस्थेत तो गेली सहा वर्षं शिक्षण घेत आहे. एका छोट्या गावचा चिमुकला किर्तनकार या गाण्यातून त्याची कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असल्याचा मला फार आनंद आहे. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला हे माझे विनम्र अभिवादन आहे.”
संगीतकार हर्ष–विजय म्हणाले, ”’शाळा मराठी’ हे गाणं करताना आम्हालाही पुन्हा एकदा आपल्या शाळेत गेल्यासारखं वाटलं. मातृभाषेची आपुलकी, शिक्षकांचा स्पर्श आणि बालपणाची ऊर्जा आम्ही संगीतामध्ये जाणवून दिली आहे. हे गाणं ऐकताना प्रत्येकाला आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील आणि हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे. आमचा हा पहिला चित्रपट आहे आणि या गाण्याचा प्रवास खूप अनोखा होता. हे गाणं करताना आम्ही सर्वांनीच खूप मजा केली. दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांचे आम्ही आभारी आहोत; त्यांनी आम्हाला ही संधी दिली.”
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’मध्ये दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट दिसणार आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचं असून, निर्मिती क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळीची, तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.
