मराठा आंदोलकांबाबत पोस्ट लिहिणं अभिनेत्रीला पडलं महागात; अखेर उचललं हे पाऊल
अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने मराठा आंदोलकांबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. आंदोलकांनी गाडी अडवून हुल्लडबाजी केल्याचा आरोप तिने केला होता. परंतु त्यावरून तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत गाडी रोखून काही आंदोलकांनी हुल्लडबाजी केल्याचा आरोप अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने केला. मुंबईत पहिल्यांदाच असुरक्षित वाटत असल्याची भावना तिने व्यक्त केली. सुमोनाने तिच्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितला. परंतु या पोस्टमुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काहींनी तर तिला थेट पश्चिम बंगालला जाण्याचा सल्ला दिला. या ट्रोलिंगनंतर अखेर सुमोनाने तिची पोस्ट इन्स्टाग्रामवरून काढून टाकली आहे.
सुमोनाच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. ‘ही मराठ्यांची भूमी पश्चिम बंगालपेक्षा फार सुरक्षित आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘मी गुजराती आहे आणि ही लोकं वाईट नाहीत. आपल्या हक्कासाठी ते मुंबईत आले आहेत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘तू महाराष्ट्रात राहतेस, दिल्लीत नाही’, असं म्हणत नेटकऱ्यांनी सुमोनाला शांत होण्याचा सल्ला दिला. काहींनी तिला मुंबई सोडून जाण्यास म्हटलंय. ‘बिहारी उरावर येऊन बसतात, तेव्हा चांगलं वाटतंय. आम्ही आलो तर तुला दुखायला लागलंय’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सुमोनाला ट्रोल केलंय. या नकारात्मक कमेंट्सनंतर अखेर सुमोनाने तिची पोस्ट डिलिट केली आहे.

काय होती सुमोनाची पोस्ट?
‘आज दुपारी 12.30 वाजता.. मी कुलाबाहून फोर्टला कारने जात होते आणि अचानक एका गर्दीने माझी गाडी अडवली. गळ्यात भगवा पंचा घातलेली एक व्यक्ती माझ्या गाडीच्या बोनेटवर जोरजोरात हात मारत होती आणि मिश्कीलपणे हसत होती. त्याचे इतर साथीदार माझ्या गाडीच्या काचेजवळ आले आणि जय महाराष्ट्रच्या घोषणा देत जोरजोरात हसत होते. आम्ही थोडं पुढे गेलो आणि पुन्हा तेच घडलं. पाच मिनिटांच्या अंतराने दोनदा ही घटना घडली. पोलीस नव्हते (आम्ही ज्यांना पाहिलं ते फक्त बसून गप्पा मारत होते.) कायदा आणि सुव्यवस्था नव्हती. दक्षिण मुंबईत भरदिवसा मला माझ्या कारमध्येही असुरक्षित वाटत होतं’ असं तिने लिहिलं.
‘मी जवळपासून माझं संपूर्ण आयुष्य मुंबईमध्ये राहिलेय. मला इथे आणि खासकरून दक्षिण मुंबईमध्ये नेहमीच सुरक्षित वाटायचं. पण आज, इतक्या वर्षांत पहिल्यांदाच, तेसुद्धा भरदिवसा मला माझ्या कारमध्येही असुरक्षित वाटत होतं,’ अशी भावना तिने व्यक्त केली होती.
