थेट पत्रकार परिषद घेऊन सर्वांना उघडं पाडेन..; सुनील शेट्टी यांची कोणाला धमकी?
सुनील शेट्टी यांनी त्यांचा मुलगा अहान शेट्टीवर टीका करणाऱ्यांबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. हे प्रकरण आणखी वाढलं तर थेट पत्रकार परिषद घेऊन सर्वांना उघडं पाडेन, असा इशारा त्यांनी दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते मुलाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरोधात टीका झाली तर अभिनेते सुनील शेट्टी त्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. लेक अथियाला ट्रोल करणाऱ्यांना त्यांनी अनेकदा चोख प्रत्युत्तर दिलंय. आता मुलगा अहान शेट्टीबाबत त्यांनी खंबीर भूमिका घेतली आहे. अहान सध्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटासाठी तयारी करत आहे. या चित्रपटामुळे त्याने इतर सगळ्या ऑफर्स नाकारल्या आहेत. परंतु त्याच्या कास्टिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना आता सुनील शेट्टी यांनी सुनावलं आहे. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील यांनी खुलासा केला की ‘बॉर्डर 2’साठी पूर्णपणे झोकून काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या मुलाला विनाकारण लक्ष्य केलं जात आहे. इतर प्रोजेक्ट्सपेक्षा या चित्रपटाला प्राधान्य दिल्याने अहानबद्दल नकारात्मक लेख लिहिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याविषयी सुनील शेट्टी म्हणाले, “मी अहानला हे स्पष्ट सांगितलं की यापुढे तू इतर चित्रपट कर किंवा नको करूस, पण या चित्रपटात स्वत:ला पूर्णपणे झोकून दे. कारण हा चित्रपट तुला जिवंत ठेवेल, तुझ्या वडिलांना येत्या अनेक दशकांपर्यंत जिवंत ठेवेल. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला हे चित्रपट आपण पाहणारच. बॉर्डर 2 वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी अहानने इतर अनेक चित्रपट नाकारले होते. या निर्णयाचे त्याला परिणामही भोगावे लागले आहेत. अहानने या चित्रपटासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग केला आहे. अहंकाराच्या पायी अनेक गोष्टी त्याच्या हातून निसटल्या आहेत. त्याला चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं आणि नंतर त्याच्यावरच आरोप करण्यात आले.”
“अहान अत्यंत महागड्या बॉडीगार्ड्ससोबत फिरतो अशा अफवा पसरवण्यात आल्या, त्याच्याविरोधात पेड आर्टिकल्स लिहिण्यात आले. आजवर मी या विषयावर बोललो नाही, पण पहिल्यांदा मी बोलत आहे. त्याच्याबद्दल निरर्थक कथा बनवल्या गेल्या. कारण अहानला बॉर्डर 2 मध्ये काम करायचं होतं आणि लोकांना त्यांचे चित्रपट बनवायचे होते. या सर्व गोष्टी हाताळल्या गेल्या आहेत. जर या गोष्टी आणखी वाढल्या तर मी सरळ पत्रकार परिषद घेईन आणि सर्वांना उघडं पाडेन. ज्यांचे चिथडे उडवायचे त्यांचे उडवेन”, अशा शब्दांत सुनील शेट्टी यांनी संताप व्यक्त केला.
अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा देशातील सर्वांत मोठा युद्धपट असेल असं म्हटलं जात आहे. यामध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजित दोसांझ, अहान शेट्टी यांच्या भूमिका आहेत. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं कळतंय.
