Sushant Death Case | बिहार निवडणुकांमुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण, महाराष्ट्राचा दावा, तिवारी क्वारंटाईन प्रकरणही गाजले, सुप्रीम कोर्टात काय काय झाले?

बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण सुरु असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

Sushant Death Case | बिहार निवडणुकांमुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण, महाराष्ट्राचा दावा, तिवारी क्वारंटाईन प्रकरणही गाजले, सुप्रीम कोर्टात काय काय झाले?

नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे मयत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्यावर प्रेम होते, मात्र आता तिलाच बळी दिले जात आहे, असा युक्तिवाद रियाच्या वकिलांनी केला. तर बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण सुरु असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याचा मुद्दा यावेळी बिहार सरकारने सुप्रीम कोर्टात उचलून धरला. (Supreme Court reserves Order in plea by Rhea Chakraborty seeking transfer of FIR in Sushant Singh Rajput Death Case)

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी दाखल केलेली एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करावी आणि बिहार पोलिसांनी केलेल्या तपासाला स्थगिती द्यावी, यासाठी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हृषीकेश रॉय यांच्या एकल खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्याच्या वडिलांनी बिहारमध्ये तक्रार दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टात काय काय झालं?

रिया चक्रवर्तीची बाजू :

श्याम दिवाण यांनी सर्वोच्च न्यायालयात रिया चक्रवर्तीची बाजू मांडली. “आपल्या याचिकाकर्त्या रिया चक्रवर्ती हिचे मयत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्यावर प्रेम होते. आता तिला ट्रोल करुन तिचा बळी दिला जात आहे” असे रियाचे वकील दिवाण यांनी कोर्टाला सांगितले. मुंबई पोलिसांनी यापूर्वी 56 जणांचे जबाब नोंदवले असून ते चांगले काम करत आहेत. रियावर एफआयआर नोंदवण्यामागे राजकीय दबाव असल्याचा दावा तिच्या वकिलांनी काही वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टलचा दाखला देत केला.

बिहार सरकारची बाजू :

वरिष्ठ अ‍ॅड. मणिंदर सिंग यांनी बिहार सरकारची बाजू मांडली. खुद्द रिया चक्रवर्तीने केलेल्या ट्वीटचा संदर्भ देत तिनेच या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती, असे मणिंदर सिंग म्हणाले.

बिहार पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र या प्रकरणात बिहार पोलिसांनी नोंदवलेली एफआयआर ही एकमेव एफआयआर असल्याचे मणिंदर सिंग म्हणाले. मुंबई पोलिसांनी कोणतीही एफआयआर दाखल केली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बिहारमध्ये नव्हे, तर महाराष्ट्रात राजकीय दबाव आहे, असे दिसते. त्यामुळे एफआयआरची नोंदणी करण्यापासून रोखले जात आहे. बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्याचा प्रकार विसरु नये, असेही मणिंदर सिंग म्हणाले.

महाराष्ट्र सरकारची बाजू :

प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी महाराष्ट्र सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांबाबत सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी कोणतीही तक्रार केली नाही. हे प्रकरण म्हणजे निव्वळ राजकारण आहे, दुसरं काही नाही. बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते सुरु आहे. एकदा निवडणूक संपली की कोण लक्षही देणार नाही, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.

कोणतीही याचिका हस्तांतरित करण्यापूर्वी मी इतकी खळबळ उडालेली कधीच पाहिली नाही. प्रत्येक अँकर, रिपोर्टर हा तज्ज्ञ झाला आहे. तपास आणि सत्यावर परिणाम होत आहे. सुशांतने आत्महत्या केली की नाही, हे मला माहिती नाही परंतु सीआरपीसीची (फौजदारी प्रक्रिया संहिता) हत्या नक्की झाली आहे, असेही सिंघवी म्हणाले. (Supreme Court reserves Order in plea by Rhea Chakraborty seeking transfer of FIR in Sushant Singh Rajput Death Case)

सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबियांची बाजू :

विकास सिंह यांनी सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबियांची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. आपले अशील के के सिंह यांनी त्यांचा मुलगा गमावला आहे. जेव्हा सुशांतच्या खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा सुशांतची बहीण अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर होती. मात्र तिने त्याचा मृतदेह
गळफास लावलेल्या अवस्थेत पाहिला नाही. त्याची बहीण येण्याची वाटही पाहिली नाही, असे विकास सिंह म्हणाले.

बिहारचे आयपीएस अधिकारी मुंबईत आले त्यावेळेस लागू असलेले नियम (दोन ऑगस्ट) सांगतात की महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारला जाईल आणि त्यांच्या शरीराचे तापमान जास्त नसेल, तर त्या व्यक्तीला सोडता येईल. पण बीएमसीने काय केले? असा सवाल त्यांनी विचारला.

हेही वाचा : तू माझ्याशी का बोलली नाहीस? सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआय चौकशीसाठी मागणी केली. त्यांच्या तथाकथित तपासाने (बेकायदेशीरपणे) मान्य केलेली भूमिका म्हणजे ही एक आत्महत्या होती. आणि दुसरी बाब म्हणजे मुंबईत या प्रकरणी एकही एफआयआर नाही, असे तुषार मेहता म्हणाले.

“मुंबई पोलिसांनी जे केले ते कायद्याच्या दृष्टीने वाईट आहे. त्यांनी प्रक्रियेनुसार कारवाई का नाही केली? फौजदारी संहितेच्या कलम 154 नुसार एफआयआर का नोंदवला नाही? 157 अंतर्गत दंडाधिकाऱ्याना का सांगितले नाही?” असे प्रश्न मेहता यांनी उपस्थित केले.

रियावर असलेले आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने 5 ऑगस्ट रोजी एफआयआर हस्तांतरित करण्यास आणि तपासावर स्थगिती देण्यास नकार दिला होता. कोर्टाने सर्व पक्षांना तीन दिवसात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते आणि मुंबई पोलिसांना सुशांतच्या मृत्यू प्रकरणी केलेल्या चौकशीची ताजी माहिती सादर करण्यास सांगितले होते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीसाठी बिहार सरकारने केलेली शिफारस मान्य केल्याचे केंद्राने सांगितले होते. (Supreme Court reserves Order in plea by Rhea Chakraborty seeking transfer of FIR in Sushant Singh Rajput Death Case)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *