मुलीला घेऊन थेट पळून जाण्याचा होता सुष्मिताचा प्लॅन, वडिलांना तयार ठेवायला सांगितली गाडी
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मिता सेनने मूल दत्तक घेतल्यानंतर कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, याविषयीचा खुलासा केला. कोर्टाने परवागनी नाकारल्यास मुलीला घेऊन पळून जाण्याचाही तिने प्लॅन केला होता.

भारतात मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी अनेक समस्यांना आणि आव्हानांना सामोरं जावं लागतं. अभिनेत्री सुष्मिता सेन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. न्यायालयातील प्रदीर्घ लढाई आणि या सर्व परिस्थितीत वडिलांनी तिची कशाप्रकारे साथ दिली, याबद्दलचा खुलासा तिने केला आहे. वयाच्या 21 व्या वर्षीच सुष्मिताने मूल दत्तक घेण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. परंतु वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत तिला त्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. डॉ. शीन गुरीब यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिताने हा संपूर्ण संघर्ष उलगडून सांगितला आहे. जर कोर्टाने परवागनी दिली नाही, तर काय करायचं, हेसुद्धा सुष्मिताने ठरवलं होतं.
“मी जेव्हा 21 वर्षांची झाली, तेव्हाच मी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत मी खूप स्पष्ट होते. परंतु 21 पासून वयाच्या 24 वर्षांपर्यंत मी त्यासाठी कायदेशीर लढाई लढत होती. ही लढाई सुरू झाली तेव्हा माझ्याकडे मुलगी होती. पण त्यानंतर सतत भीती असते की जर फॅमिली कोर्टाने माझ्या बाजूने निर्णय दिला नाही तर? ते माझं मूल पुन्हा घेऊ शकतात आणि तोपर्यंत मुलीने मला ‘माँ’ असं म्हणायलाही सुरुवात केली होती. तेव्हा मी दुसरा प्लॅन तयार ठेवला. कोर्टातील सुनावणीच्या वेळीच मी वडिलांना त्यांची कार तयार ठेवायला सांगितली होती. मुलीला घेऊन सरळ पळून जा, असं मी त्यांना म्हटलं होतं. तेव्हा ते म्हणाले, असं काहीच करायची गरज नाही. पण कोर्ट माझ्याकडून माझ्या मुलीला परत घेऊ शकत नाही, याबद्दल मी खूप हट्टी होते”, असं सुष्मिताने सांगितलं.
View this post on Instagram
वडिलांच्या पाठिंब्याबद्दल सुष्मिता पुढे म्हणाली, “मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान आहे. त्यांच्यामुळेच मी मूल दत्तक घेऊ शकले. तेसुद्धा एका अशा देशात, जिथे मूल दत्तक घेण्यासाठी वडील किंवा वडीलधारी व्यक्ती असणं खूप महत्त्वाचं असतं. माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी त्यांना आर्थिक बाजू दाखवावी लागेल आणि त्यांच्या मालमत्तेच्या अर्ध्याहून अधिक रकमेवर स्वाक्षरी करावी लागेल, असं कोर्टाने त्यांना सांगितलं होतं. पण माझ्या वडिलांनी कोर्टाला सांगितलं, मी काही फार श्रीमंत माणूस नाही. जर तुम्ही त्यातील अर्धी संपत्ती घेतली तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. मी तिच्या नावावार माझ्या मालकीच्या सर्व गोष्टींवर बिनशर्त स्वाक्षरी करण्यासाठी आलो आहे.”
सुष्मिताने पुढे सांगितलं, “न्यायालयाने माझ्या वडिलांना इशारा दिला होता की ‘सिंगल मदर’ असल्याने तिला कधीही लग्नासाठी जोडीदार मिळणार नाही. तेव्हा माझ्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी माझ्या मुलीला कोणाची पत्नी म्हणून वाढवलं नाही.” पहिली मुलगी दत्तक घेतल्यानंतर दुसऱ्या मुलीच्या वेळी सुष्मिताला प्रक्रिया तुलनेनं सोपी गेली. रेने आणि अलिसा अशी तिच्या मुलींची नावं आहेत.
