भारत-पाकिस्तानबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीची अशी पोस्ट; खवळले नेटकरी
ऑपरेशन सिंदूरनंतर या अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. यावरून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. तू सुद्धा पाकिस्तानला निघून जा.. अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

कुटुंबीयांसमोर निष्पाप पर्यटकांचं बळी घेणाऱ्या पाकिस्तानमधील दहशतवादाला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ने चोख प्रत्युत्तर दिलं. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनांचे नऊ तळ भारतीय सैन्यदलाने अवघ्या 25 मिनिटांत उद्ध्वस्त केलं. अचूक माहितीच्या आधारे एअर स्ट्राइक करत भारताने पाकिस्तानात आश्रित असलेल्या दहशतवादाचं कंबरडं मोडलं आहे. या ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरातून भारतीय सैन्याचं कौतुक होत असतानाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मात्र सोशल मीडियावर एक वेगळाच फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एकीकडे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक हे त्यांच्या आप्तस्वयिकांच्या मृत्यूने दु:खी दिसत असून, दुसरीकडे सत्ताधारी मात्र घरात निवांत बसलेले दाखवलं गेलंय. या फोटोवरून नेटकरी चांगलेच खवळले आहे.
भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचं वातावरण असताना सोशल मीडियावर अभिनेत्री राखी सावंतने अशी पोस्ट शेअर केली आहे. राखी सावंत ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. पहलगाम हल्ल्यानंतरही तिने पाकिस्तानची बाजू घेणारी पोस्ट लिहिली होती. इतकंच नव्हे तर ती पाकिस्तानी पुरुषाशी लग्न करणार असल्याचीही मध्यंतरी चर्चा होती. पहलगाम हल्ल्यानंतर राखीने अक्षरश: पाकिस्तानचा उदो-उदो केला होता. “मी पाकिस्तानी लोकांसोबत आहे, जय पाकिस्तान” असं तिने म्हटलं होतं. यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर खूप टीका केली होती.
View this post on Instagram
आता राखीच्या या नव्या पोस्टवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘पाकिस्तानविषयी सहानुभूती दाखवू नकोस’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू सुद्धा पाकिस्तानला निघून जा’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आम्हाला शांती हवी’ असंही काहींनी लिहिलं आहे. पाकिस्तानी कलाकारांप्रमाणेच राखी सावंतवरही बंदी आणा, तिला बॉयकॉट करा.. अशी मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर ‘जय पाकिस्तान’ म्हणणाऱ्या राखीविरोधात मनसेनं जाहीर निषेध व्यक्त केला होता. “राखीने भारतात राहून इथल्या प्रेक्षकांच्या जीवावर नाव गमावलं, पैसा कमावला. आता ती पाकिस्तानचा उदो-उदो करतेय. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो की अशा व्यक्तीला भारतातून हाकललं पाहिजे”, मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे म्हणाले होते.
