या एका कारणामुळे पत्नीपासून लपवलं होतं सतीश शहा यांच्या निधनाचं वृत्त
अभिनेते सतीश शहा यांच्या निधनाचं वृत्त त्यांच्या पत्नीपासून बराच वेळ लपवण्यात आलं होतं. यामागचं कारण समोर आलं आहे. सतीश यांचं शनिवारी दुपारी निधन झालं. गेल्या काही काळापासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते.

हिंदी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शहा यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वार शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर पत्नी मधु शहा पूर्णपणे एकट्या पडल्या आहेत. मधु यांच्या आरोग्याची स्थिती जाणून त्यांच्यापासून सतीश शहा यांच्या निधनाचं वृत्त बराच वेळ लपवून ठेवण्यात आलं होतं. सतीश यांचे जवळचे मित्र आणि दिग्दर्शक विवेक शर्मा यांनी याबद्दलची माहिती दिली. मधु यांना अल्झाइमर असल्याने त्या कोणाला ओळखू शकत नाहीत. त्यामुळे सतीश यांच्या निधनाची माहिती त्यांना बऱ्याच वेळापर्यंत सांगण्यात आली नव्हती.
मधु शहा जेव्हापासून आजारी पडल्या, तेव्हापासून त्या घरीच असतात. त्याआधी त्या फॅशन डिझायनर म्हणून काम करत होत्या. त्यांना प्रकाशझोतात राहायला आवडत नाही. सतीश आणि मधु यांची पहिली भेट 1970 च्या दशकात एका चित्रपट महोत्सवात झाली होती. पहिल्याच भेटीत सतीश त्यांच्या प्रेमात पडले होते आणि त्यांच्याशीच लग्न करायचं ठरवलं होतं. परंतु त्यांनी जेव्हा प्रपोज केलं, तेव्हा मधु यांनी त्यांना नकार दिला. तरीही हार न मानता सतीश यांनी त्यांना पुन्हा प्रपोज केलं. अखेर तिसऱ्यांदा त्यांनी थेट लग्नाची मागणी घातली. तेव्हा मधु यांनी त्यांच्या आईवडिलांची परवानगी घेण्यास सांगितलं आणि अखेर 1972 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. सतीश शहा आणि मधु शहा यांनी पाच दशकांपर्यंत एकमेकांची साथ दिली. आता त्यांच्या निधनानंतर मधु पूर्णपणे खचल्या आहेत.
सतीश शहा यांनी ‘जाने भी दो यारो’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘उमराव जान’, ‘कभी हाँ कभी ना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. शनिवारी दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांचं निधन झालं. ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहा यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सतीश यांनी सत्तरच्या दशकांत चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांना ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेद्वारे ओळख मिळाली. 1984 मध्ये त्यांनी टेलिव्हिजन विश्वात प्रवेश केला. ‘ये जो है जिंदगी’ या सिटकॉमच्या 55 भागांमध्ये त्यांनी 55 विविध भूमिका साकारल्या होत्या.
