Dashavatar : ‘दशावतार’ पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले.. ‘कथा कोकणची, पण व्यथा..’
Dashavatar : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 'दशावतार' या चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावर मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले, ते जाणून घ्या..
Dashavatar : ‘दशावतार’ या चित्रपटाची कथा जरी कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज आपण कुठे आहोत नि कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळीच ओळखलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे, अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘दशावतार’ या चित्रपटाची प्रशंसा केली. “या चित्रपटातील सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवलंय ते अद्भुत आहे. सुबोध खानोलकर या तरुण दिग्दर्शकाने एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय,” असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘दशावतार’ या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता.
ठाकरे कुटुंबासाठी विशेष शो
‘दशावतार’च्या या विशेष शोला उद्धव ठाकरेंसह, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत ,शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या. ‘दशावतार’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या कामाची उद्धव ठाकरेंनी प्रशंसा केली. चित्रपटातील कलाकार सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, अजित भुरे यांच्यासह संपूर्ण टीमचं त्यांनी कौतुक केलं.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
“कित्येक काळानंतर मराठीत असा भव्य चित्रपट पाहिला. ही भव्यता, हे सौंदर्य रसिकांनी रूपेरी पडद्यावरच अनुभवायला हवं. केवळ कोकणातील लोकांनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने ही कलाकृती मोठ्या पडद्यावर पहायला हवी,” असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. तसंच ‘दशावतार’ ने मराठी चित्रपटाला जी भव्यता मिळवून दिली त्याबद्दल झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर, निर्माता सुजय हांडे, सुबोध खानोलकर , ओंकार काटेसह ‘ दशावतार ‘ च्या सर्वच निर्मात्या मंडळींचं अभिनंदन उद्धव ठाकरेंनी केलं.
‘दशावतार’ या चित्रपटाने सहा दिवसांत 9.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. केवळ मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकसुद्धा या चित्रपटाकडे आकर्षित झाला आहे. माऊथ पब्लिसिटीचाही या चित्रपटाला चांगला फायदा होत आहे. सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत असून प्रेक्षकांकडून ‘दशावतार’ ला प्रचंड दाद मिळत आहे.
