Yashwant Sardeshpande : प्रसिद्ध दिग्दर्शक यशवंत सरदेशपांडे यांचं हार्ट अटॅकने निधन
कन्नड रंगभूमीवरील दिग्गज कलाकार यशवंत सरदेशपांडे यांचं वयाच्या 60 व्या वर्षी निधन झालं. बेंगळुरूतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी संध्याकाळी त्यांनी नाटक सादर केलं होतं. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती.

Yashwant Sardeshpande : ज्येष्ठ रंगभूमी कलाकार आणि चित्रपट दिग्दर्शक यशवंत सरदेशपांडे यांचं सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. रविवारी संध्याकाळी धारवाडमध्ये नाटक सादर केल्यानंतर ते सोमवारी सकाळी बेंगळुरूला आले होते. बेंगळुरूला पोहोचताच त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने तिथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यशवंत सरदेशपांडे यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियाद्वारे सरदेशपांडे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘हुबळीतील आमचे रहिवासी यशवंत सरदेशपांडे यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप दु:ख झालं. ते कन्नडमधील प्रसिद्ध रंगभूमी कलाकार आणि अत्यंत लोकप्रिय नाटककार होते. ज्यांनी राज्यभरात अनेक नाटकांमध्ये काम केलं आणि दिग्दर्शनही केलंय. त्यांचं ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक प्रचंड यशस्वी झालं होतं. त्यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्येही काम केलंय’, अशा शब्दांत जोशी यांनी भावना व्यक्त केल्या.
यशवंद सरदेशपांडे यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बसवाना बागेवाडी तालुक्यातील उक्काली गावात झाला होता. त्यांनी हेग्गोडू इथल्या निनासम थिएटर इन्स्टिट्यूटमधून नाट्यकलेत डिप्लोमा मिळवला होता. नंतर 1996 मध्ये त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून चित्रपट आणि नाट्यलेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘ऑल द बेस्ट’ शिवाय ‘राशीचक्र’, ‘ओेलावे जीवन सशक्तकरा’, ‘निनानद्रे नानीनेना’, ‘सही री सही’, ‘ओंडा भात्रड्डू’, ‘अंधयुगन’, ‘साहेबरू बरुत्तरे’, ‘मिस पॉईंट’, ‘दिल मांगे मोरे’यांमध्येही त्यांनी काम केलंय. त्यांनी साठहून अधिक नाटकांचं दिग्दर्शन केलंय. आजवरच्या कारकिर्दीत यशवंत सरदेशपांडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. यामध्ये राज्योत्सव पुरस्कार, आर्यभट्ट पुरस्कार, मयूर पुरस्कार, अभिनय भारती पुरस्कार, रंगध्रुव पुरस्कार यांचा समावेश आहे. नाट्य क्षेत्रातील आवडीमुळे ते 1985-86 मध्ये निनासम हेग्गोडू रेपर्टरीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनसाठी नाटकं आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांचं दिग्दर्शनदेखील केलं आहे. कन्नड रंगभूमीसाठी त्यांनी विशेष योगदान दिलंय.
