Daya Dongare: ‘खाष्ट सासू’ काळाच्या पडद्याआड, दया डोंगरे यांचे निधन
Daya Dongare Passed Away: 'चार दिवस सासूचे मालिके काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Daya Dongare Passed Away: मराठी मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या ८५व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कलाविश्वात शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या भूमिकांनी मराठी सिनेमात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
१९४० साली पुण्यात जन्मलेल्या दया डोंगरे यांना कलेचा वारसा पिढ्यान्पिढ्या चालत आला होता. त्यांच्या आई यमुनाबाई मोडक या प्रसिद्ध नाट्यअभिनेत्री होत्या, तर आत्या शांताबाई मोडक गायिका होत्या. तसेच त्यांचे पणजोबा कीर्तनकार होते. शालेय काळापासूनच अभिनयाची आवड असलेल्या दया फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत असत. नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (एनएसडी) नाट्यशिक्षण घेतले, जिथे त्यांना गायन आणि अभिनयासाठी शिष्यवृत्ती मिळाली.
लग्नानंतर दया दिल्लीत स्थायिक झाल्या. तसेच पतीच्या पाठिंब्यामुळे त्यांनी करिअर सुरू ठेवले. १९६४ पासून दिल्ली दूरदर्शनवर काम करत त्यांनी १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शनमध्ये ‘गजरा’, ‘बंदिनी’ आणि ‘आव्हान’ यांसारख्या कार्यक्रमांसाठी काम केले. ‘स्वामी’ या लोकप्रिय मालिकेत गोपिकाबाईची भूमिका साकारून त्यांनी छोट्या पडद्यावर यश मिळवले. नाटकांमध्येही त्यांचा मोठा सहभाग होता
चित्रपट आणि मालिकांमधील अमर भूमिका
मराठी चित्रपटसृष्टीत ‘उंबरठा’ (१९८२) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून दया यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. यानंतर ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नकाब’, ‘लालची रुक्ष माती’, ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘कुलदीपक’ यांसारख्या मराठी-हिंदी चित्रपटांत त्यांनी नकारात्मक भूमिका, विशेषतः ‘खाष्ट सासू’च्या भूमिका साकारल्या. ‘तुझी माझी जमली जोडी रे’, ‘नांदा सौख्य भरे’ यांसारख्या मालिकांमध्येही त्या दिसल्या. ‘दौलत की जंग’ (१९९२) आणि ‘आत्मविश्वास’ (१९८९) सारख्या हिंदी चित्रपटांत दिसल्या.
वैयक्तिक जीवन आणि कुटुंब
दया यांना दोन विवाहित मुली आहेत. मोठी मुलगी संगीता मुंबईत आणि धाकटी अमृता बंगळुरूमध्ये राहते. नातवंडांसह कुटुंबीय नियमित दया यांना भेटण्यासाठी येत असत. पती शरद डोंगरे यांचं २०१४ मध्ये अकस्मात निधन झाले. त्यानंतर दया यांना मोठा धक्का बसला होता.
