छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विकी कौशलची भावूक पोस्ट; ‘काही भूमिका..’
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेता विकी कौशलने ही खास पोस्ट लिहिली आहे. 'छावा' या चित्रपटात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील एक फोटो पोस्ट करत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. अशातच छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसानिमित्त विकीने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. आपल्याच लोकांच्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडतात. त्यानंतर धर्मांतर करण्यास मनाई केल्याने औरंगजेब त्यांचा अतोनात छळ करतो. याच छळाच्या सीनदरम्यानचा हा फोटो विकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. ‘काही भूमिका तुमच्यासोबत कायम राहतात आणि छावामधील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही त्यापैकीच एक आहे’, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.
विकी कौशलची पोस्ट-
’11 मार्च 1689 – शंभुराजे बलिदान दिवस. आज, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्या योद्धांना वंदन करतो ज्यांनी शरणागतीपेक्षा मृत्यूची निवड केली, जे अकल्पनीय छळाला तोंड देत उभे राहिले आणि जे आपल्या विचारांसाठी जगले आणि प्राण सोडले.’
‘काही भूमिका तुमच्यासोबत कायम राहतात आणि ‘छावा’मधील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही त्यापैकीच एक आहे. त्यांची कहाणी केवळ इतिहास नाही, तर ती धैर्य, त्याग आणि एक अमर आत्मा आहे जी अजूनही लाखो लोकांना प्रेरणा देते. जिवंत राहो.. जय भवानी, जय शिवाजी! जय संभाजी,’ असं त्याने लिहिलंय.
View this post on Instagram
विकीच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आमचा वाघ हरपला’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आज आणि सदैव राजे आमच्या स्मरणात राहतील’ असं दुसऱ्याने लिहिलंय. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अलिम हकीमनेही विकीच्या पोस्टवर कमेंट केली आहे. ‘हा फोटो म्हणजे जणू एक पेंटिंग आहे आणि चित्रपटातील तुझं परफॉर्मन्ससुद्धा अमूल्य पेंटिंगसारखंच आहे’, असं त्याने लिहिलंय. ‘जय शंभुराजे, तुमच्या यातना आम्ही कधीच विसरणार नाही’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या फोटोवर दिल्या आहेत.
शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनाच्या 25 दिवसांत या चित्रपटाने जगभरात 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.
