ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर भडकून अभिषेक म्हणाला, ‘माझं दुसरं लग्न..’

गेल्या काही दिवसांपासून अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी 'दसवी' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना आऱाध्या ही मुलगी आहे.

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर भडकून अभिषेक म्हणाला, माझं दुसरं लग्न..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2024 | 10:15 AM

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही नवीन नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून सतत या दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र बच्चन कुटुंबीयांपासून ऐश्वर्याचं दूर राहणं पाहून नेटकरी विविध शक्यता वर्तवत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत पोहोचला होता. मात्र फक्त ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या वेगळ्या आल्या होत्या. यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. याआधी 2014 मध्येही या दोघांच्या नात्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी अभिषेकने ट्विटरवर पोस्ट लिहित संतप्त प्रतिक्रिया दिली होती.

2014 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांना वैतागून अखेर अभिषेकने ट्विटरवर पोस्ट लिहिली होती. या पोस्टद्वारे त्याने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. अभिषेकने लिहिलं होतं, ‘ओके.. तर माझा घटस्फोट होत आहे. मला सांगण्यासाठी धन्यवाद. तुम्ही मला सांगू शकता का की माझं दुसरं लग्न कधी होईल? धन्यवाद!’ त्यावेळी अभिषेकच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

गेल्या महिन्यात अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या एपिसोडमध्ये बिग बी आणि प्रेक्षकांना एक खास व्हिडीओ दाखवण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंबीय त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले होते. पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, मुलगा अभिषेक बच्चन, नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नवेली नंदा हे सर्वजण या व्हिडीओमध्ये बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. यासोबतच नात आराध्याचेही काही फोटो त्यात दाखवण्यात आले. मात्र या सर्वांत बिग बींची सून ऐश्वर्या राय कुठेच दिसली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने मुलीला जन्म दिला. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र त्यावर अद्याप कोणीच प्रतिक्रिया दिली नाही. ऐश्वर्या आणि अभिषेकला बऱ्याच काळापासून एकत्र पाहिलं गेलं नाही. अंबानींच्या लग्नालाही ते दोघं वेगवेगळे आले, म्हणून या चर्चांना आणखी हवा मिळाली.