किती आले, किती गेले..; ‘तारक मेहता..’मधील जेठालाल-बबिताच्या एक्झिटबाबत ‘भिडे’चा टोला
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या गेल्या काही एपिसोडमधून जेठालाल आणि बबिता या दोन भूमिका गायब आहेत. तरीही मालिकेचा टीआरपी नंबर वन आहे. यावर आता भिडे मास्तरांची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकरने प्रतिक्रिया दिली आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या तीन आठवड्यांपासून टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी आहे. या कॉमेडी शोनं मोठमोठ्या हिंदी मालिकांना मागे टाकलं आहे. यावर आता मालिकेत आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत मालिका सोडणाऱ्यांनाही त्याने अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “सर्वकाही होऊनही या मालिकेनं आपलं स्थान कायम राखलं आहे”, असं त्याने म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत जेठालाल आणि बबिताची भूमिका साकारणारे दिलीप जोशी, मुनमुन दत्ता यांनी एक्झिट केल्याची चर्चा होती. या दोघांनी मालिका सोडल्याचं म्हटलं जात होतं.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मंदार म्हणाला, “आम्हाला अभिमान आहे की 17 वर्षांनंतरही आम्हाला प्रेक्षकांकडून आणि चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतंय. या मालिकेच्या सुरुवातीला ते जितकं प्रेम आमच्यावर करायचे, तितकंच ते आजही करतायत. आता मालिकेच्या टीआरपीतही मोठा बदल झाला आहे आणि आमच्यासाठी हे खूप मोठं यश आहे. 17 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि 18 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊ इच्छितो. इतक्या वर्षांत किती आले आणि किती गेले, परंतु या मालिकेनं नेहमीच आपलं स्थान कायम ठेवलं आहे. यामागे सर्वांत मोठं कारण म्हणजे या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी. आजसुद्धा ते दररोज लेखकांसोबत बसतात आणि कथेवर बारकाईने काम करतात.”
View this post on Instagram
मालिकेचा टीआरपी कशामुळे वाढला, याविषयी सांगताना मंदार पुढे म्हणाला, “सध्याचा भूताचा ट्रॅक प्रेक्षकांना खूप आवडतोय. गोकुळधाम सोसायटीत राहणारे सदस्य सध्या भीतीच्या छायेत आहेत आणि त्यातून जे घडतंय, ते लोकांना भावतंय. सध्याच्या कथेवर विविध रील्स आणि मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत. आम्ही या कथेच्या क्लायमॅक्ससाठी एका मोठ्या ट्विस्टची तयारी करतोय. प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मजेशीर गोष्टी पहायला मिळणार आहेत. सध्याची कथा प्रेक्षकांना आवडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे यात एक मुलगी आहे, जिच्याकडे पाहण्याचे दृष्टीकोन दोन वेगवेगळे आहेत. त्यामुळेच कॉमेडी आणि संभ्रम यांची चांगली सांगड घालता येत आहे.”
