Zubeen Garg : झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी प्रसिद्ध संगीतकार ताब्यात; मॅनेजरच्या घरावरही छापा
Zubeen Garg death case : आसामी गायक झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी एसआयटीकडून कसून चौकशी केली जात आहे. एकीकडे त्याच्या मॅनेजर आणि नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला.

Zubeen Garg death case : प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्गच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलंय. आसामच्या एसआयटीने गुरुवारी संगीतकार शेखर ज्योती गोस्वामीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगसाठी गेलेल्या यॉटवर झुबीनसोबत शेखरसुद्धा उपस्थित होता, असं कळतंय. परंतु गोस्वामीच्या अटकेबाबत चौकशी अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. एसआयटीच्या पथकाने झुबीन गर्गचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंत यांच्या घरावरही छापे टाकले. परंतु सिद्धार्थ आणि श्यामकानू हे दोघंही त्यांच्या धीरेनपारा आणि गीतानगर इथल्या निवासस्थानी उपस्थितन नव्हते, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
गुरुवारी झुबीन गर्गच्या मॅनेजरच्या निवासस्थानाबाहेर काही लोक जमले आणि त्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. यामुळे पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. झुबीनच्या मृत्यूच्या चौकशीसंदर्भात सिद्धार्थ शर्माच्या निवासस्थानी छापा टाकणाऱ्या एसआयटी पथकाला पोलीस कर्मचारी सुरक्षा देत होते. त्याचवेळी संतप्त चाहत्यांनी निवासस्थानाचा मुख्य प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असल्याने त्यांना तसं करता आलं नाही. म्हणून त्यांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.
दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की जर कोणत्याही टप्प्यावर एसआयटी चौकशी असमाधानकारक आढळली, तर राज्य सरकार सीबीआय चौकशीची शिफारस करेल. त्याचप्रमाणे झुबीनच्या मृत्यूप्रकरणी सिंगापूरमधील आसाम असोसिएशनचे सदस्य आणि नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक या सर्वांची चौकशी एसआयटी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “एसआयटीच्या चौकशीवर विश्वास ठेवा आणि सोशल मीडियावर अफवा पसरवू नका. त्यामुळे तपासात अडथळा येऊ शकतो”, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.
‘या अली’ आणि ‘जाने क्या चाहे मन’ यांसारख्या ब्लॉकबस्टर गाण्यांचा गायक झुबीन गर्गचा 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला. सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलंय. याप्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडून केला जात आहे. आम्ही कोणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
