‘पीछे देखो पीछे’ मीम फेम अहमद शाहच्या भावाचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू; लहान वयातील मुलांमध्ये का वाढतोय धोका?
'पीछे देखो पीछे' या मीममुळे लोकप्रिय झालेल्या अहमद शाहच्या भावाचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू झाला आहे. लहान वयात कार्डिॲक अरेस्टचं प्रमाण का वाढतंय, त्याची लक्षणे काय आणि हृदय निरोगी कसं ठेवाल, याबद्दल सविस्तर जाणून घ्या..

सोशल मीडियावर ‘पीछे देखो पीछे’ या मीममुळे लोकप्रिय झालेला बालकलाकार अहमद शाहला तुम्ही ओळखतच असाल. त्याचा छोटा भाऊ उमर शाहच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अवघ्या काही क्षणांमध्ये त्याने आपले प्राण गमावले आणि डॉक्टरसुद्धा काहीच करू शकले नाहीत. रिपोर्ट्सनुसार, उमरला अचानक कार्डिॲक अरेस्ट आला आणि त्याचं हृदय धडधडणं बंद झालं. अहमद शाहने त्याच्या इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहित छोट्या भावाच्या निधनाची माहिती दिली. इतक्या कमी वयात हृदयरोग किंवा कार्डिॲक अरेस्ट येणं, ही धक्कादायक बाब आहे. परंतु आता ही समस्या फक्त वृद्धांपर्यंतच मर्यादित राहिलेली नाही. तरुण वर्ग आणि लहान मुलांनाही हृदयरोगाचा सामना करावा लागतोय.
कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डिॲक अरेस्टला सामान्य भाषेत सांगायचं झालं तर अचानक हृदय धडधडणं बंद होणं. असं झाल्यावर रक्तप्रवाह थांबतो आणि व्यक्ती बेशुद्ध पडते. कार्डिॲक अरेस्ट आल्यानंतर त्वरित वैद्यकीय उपचार झाले नाही तर काही मिनिटांतच मृत्यू होऊ शकतो.
हार्ट अटॅक आणि कार्डिॲक अरेस्ट यांमधील फरक
अनेकांना हार्ट अटॅक आणि कार्डिॲक अरेस्ट हे दोन्ही एकच असल्याचं वाटतं. परंतु या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत. हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह थांबतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. कार्डिॲक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके थांबतात. हे अनेकदा अचानक घडतं.
लहान वयात हृदयविकाराचं प्रमाण का वाढतंय?
- जंक फूड, प्रक्रिया केलेलं अन्न आणि जास्त साखरेचं सेवन यांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं. परिणामी हृदयाच्या नसा ब्लॉक होऊ शकतात.
- सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव ही सामान्य समस्या बनली आहे. सततच्या तणावामुळे शरीरात कॉर्टिसोलसारखे तणावाचे संप्रेरक वाढतात, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो.
- कॉम्प्युटर आणि मोबाइलवर तासनतास बसून राहिल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. व्यायामाचा अभाव असल्याने लठ्ठपणा वाढतो आणि हृदयाच्या कार्यावर दबाव येतो.
- पुरेशी झोप न घेणंही हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. कमी झोपेमुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.
- धूम्रपान आणि मद्यपानामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
- हृदयविकार हा अनुवंशिकही असतो. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला हृदयरोग असेल तर तुम्हालाही धोका असू शकतो.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
- छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दुखणं, वेदना जाणवणं किंवा प्रचंड अस्वस्थ वाटणं.
- श्वास घेण्यास त्रास जाणवणं.
- शरीराच्या वरच्या भागात म्हणजेच मान, जबडा, पाठ किंवा डाव्या हातात वेदना जाणवणं.
- अचानक खूप घाम येणं किंवा अशक्तपणा जाणवणं.
हृदय निरोगी कसं ठेवाल?
- आहारात फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. जंक फूड आणि जास्त गोड पदार्थ टाळा.
- दररोज किमान 30 मिनिटं चालणं, सायकल चालविणं किंवा कोणताही व्यायाम करणं.
- ताणतणाव कमी करण्यासाठी योगासनं, ध्यानसाधना किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.
- तुमच्या कुटुंबात कोणाला हृदयरोगाचा इतिहास असेल तर डॉक्टरांकडून नियमित आरोग्य तपासणी करून घ्या.
