Women’s Day 2023 : तणावाचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो परिणाम, तज्ज्ञांकडून जाणून घ्या माहिती
तणाव महिलांसाठी कसा घातक आहे, त्याचा स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो हे आज जाणून घेऊया.

नवी दिल्ली : तणाव (stress) ही एक समस्या आहे जी आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करू शकते. त्यामुळे रक्तदाबापासून (blood pressure) हृदय आणि मेंदूपर्यंतचे आजार होतात. यामुळेच आरोग्य तज्ज्ञ तणावापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा सल्ला देतात. याशिवाय तणावामुळे महिलांच्या आरोग्यावरही (woman health) परिणाम होतो. त्यामुळे महिलांमध्ये प्रजोत्पादनाशी (fertility problems) संबंधित समस्या देखील दिसून येतात. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तणावाचा सामना कसा करावा हे जाणून घेऊया.
तणाव प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतो?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तणाव कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वप्रथम, तुम्हाला कोणत्या प्रकारचा तणाव आहे हे ओळखणे आवश्यक आहे. जसे तुम्हाला तुमच्या कामाचा ताण, वेळेच्या व्यवस्थापनाचा ताण, वजनासंबंधित ताण आहे किंवा गर्भधारणा न होण्याचा ताण आहे, ते ओळखावे. तसेच तुम्हाला तुमच्या तणावाची कारणे ओळखावी लागतील. स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेमध्ये तणाव खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे आणि माइंडफुलनेसचा सराव केल्याने महिलांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.
तणाव कमी करण्याचे काही मार्ग :
योग्य, हेल्दी आहार : प्रजनन क्षमतेवर आहाराचा मोठा प्रभाव पडतो. जर आहार योग्य नसेल तर स्त्रीची प्रजनन क्षमता आणि हार्मोन्सच्या संतुलनावर नकारात्मक परिणाम होतो. वेळेवर खाणे, नाश्ता करणे, हिरव्या पालेभाज्या आणि व्हिटॅमिन-सी असलेले पदार्थ खाणे, जास्त फायबर आणि कमी कर्बोदकांचा आहार घेणे आणि चांगले आरोग्य राखणे या गोष्टी गर्भवती महिलांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. विशेषत: PCOS असलेल्या महिलांनी नाश्ता करणे टाळू नये कारण दररोज नाश्ता केल्याने हार्मोनल असंतुलन होत नाही. नोकरदार महिलांना अशा आहाराचे पालन करणे कठीण जाऊ शकते. पण अशावेळी जेवणाचे उत्तम नियोजन करण्यासाठी त्या आहारतज्ज्ञांची मदत घेऊ शकतात.
चांगली व पुरेशी झोप घ्या : शांत, सूदिंग संगीत ऐकल्याने चांगली झोप लागते. यामुळे झोपेचे चक्रही सुधारते. प्रत्येक स्त्रीने 7 ते 8 तासांची चांगली व शांत झोप घेतली पाहिजे, कारण गर्भधारणेचा प्रयत्न करताना मन सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला पुरेशी झोप मिळाली तरच मनाला बरे वाटू शकते.
हायड्रेटेड रहावे : प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे खूप महत्वाचे आणि आवश्यक आहे.
जोडप्यामध्ये उत्तम संवाद (संभाषण) खूप महत्वाचा : पती-पत्नीमध्ये खुले संवाद होणे खूप महत्वाचे आहे. यामुळे कोणतीही शंका, भीती किंवा गैरसमज दूर होण्यास मदत होते. अनेकदा गरोदरपणात ही समस्या जोडप्यांमध्ये दिसून येते. नुकतेच बाळ झालेल्या मित्र/नातेवाईकांशी बोलणे देखील मदत करू शकते.
प्रीनेटल काऊन्सेलिंग (प्रसूतीपूर्व समुपदेशन) : गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी जोडप्याने स्त्रीरोगतज्ञ किंवा प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा जेणेकरून ते गर्भधारणेसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतील.
व्हिटॅमिनचे सेवन : प्रजनन क्षमता चांगली राखण्यासाठी जीवनसत्त्वे मोठी भूमिका बजावतात. गर्भधारणा करण्यापूर्वी तसेच गर्भधारणेदरम्यान व्हिटॅमिन-ई, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-बी12 हे खूप महत्त्वाचे असते.
जीवनातील ताण कसा कमी करावा ?
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तणावाचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर आणि फर्टिलिटीवर वाईट परिणाम होतो. म्हणून, तणाव कमी करून प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आणि गर्भधारणेची अधिक चांगली शक्यता निर्माण करण्यासाठी या टिप्सचे पालन करता येऊ शकते –
शरीर रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा : योग्य पद्धतीने विश्रांती कशी घ्यावी हे तंत्राद्वारे शिकता येऊ शकते. खोल आणि दीर्घ श्वास, ध्यान आणि योग इत्यादी. यामुळे चिंता आणि तणाव कमी होतो आणि एखाद्याचे आरोग्य सुधारते. या पद्धतींचा नित्यक्रमात समावेश केल्याने तणाव नियंत्रणात आणि प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.
पुरेशी झोप घ्या : अपुऱ्या झोपेमुळे तणाव आणि हार्मोनल असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून, ताण कमी करण्यासाठी आणि प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी, दररोज 7 ते 8 तासांची झोप घ्या.
दररोज व्यायाम करा : व्यायामामुळे तणाव कमी होऊन आरोग्य सुधारते. दररोज किमान ३० मिनिटे हलका व्यायाम करा. वेगाने चालणे, जॉगिंग किंवा सायकल चालवणे हे चांगले व्यायाम आहेत.
निरोगी आहार घ्या : फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने समृध्द आहार घेतल्याने तणाव कमी करून प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरयुक्त पेये घेऊ नका, कारण त्यांचा हार्मोन्सच्या संतुलनावर वाईट परिणाम होतो.
मद्यपान व धूम्रपान करणे टाळावे. ते आरोग्यासाठी अतिशय घातक असून त्याने ताण वाढू शकतो.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
