Sleepwalking : लोकं झोपेतून उठून का चालू लागतात ? जाणून घ्या कारण
रात्री आपल्या बेडवर झोपलेली माणसं सकाळी उठल्यावर हॉलमध्ये सोप्यावर झोपलेली आढळतात. पण हे कसं झालं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. काही जणांना झोपेत चालण्याचा आजार असू शकतो.

नवी दिल्ली | 8 ऑगस्ट 2023 : एखादी व्यक्ती झोपेतून उठून चालत-चालत दुसरीकडे पोहोचली, असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल किंवा चित्रपटात वगैरे पाहिलेही असेल. ते ऐकून कदाचित तुम्हाला हसायलाही आलं असेल पण ज्यांना खरंच झोपेत चालण्याची सवय (sleepwalking) किंवा समस्या असेल त्यांचं काय ? त्यांना किती त्रास होत असेल ना ?
तुमच्या सोबतही असं कधी झालं आहे का, की रात्री तुम्ही खोलीत झोपलात पण सकाळी जाग मात्र हॉलच्या सोफ्यावर आली आहे ? खरंतर स्लीपवॉकिंग किंवा झोपेत चालण्याची समस्या अनेकांना असते, आणि त्यामागे अनेक कारणेही असू शकतात. झोपेत चालत एका जागेहून दुसऱ्या जागी जाणं, सकाळी उठल्यावर त्याबद्दल काहीच न आठवणं याला सोमनांबूलिज्म (somnambulism) असं म्हटलं जातं, तो एक आजार आहे.
या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती झोपेत केवळ एका जागेवरून दुसऱ्या जागी जात नाही तर वेगवेगळ्या क्रियाही करते. या आजाराचे नेमके कारण काय आणि त्यावर उपाय काय, डॉक्टरांकडे कधी जाणे गरजेचे असते हे जाणून घेऊया.
झोपेत चालण्याचा आजार काय असतो ?
ज्येष्ठ न्यूरोसर्जन्सच्या सांगण्यानुसार, झोपेत चालण्याचा आजार हा एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही मेंदूशी संबंधित एक समस्या आहे. खरंतर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात जी काम करतो, ते सर्व आपल्या नर्वस सिस्टम द्वारे ऑपरेट होतं. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर झाल्यास आपल्या शरीराच्या बॅलेन्सपासून ते बोलणे, स्मरणशक्ती तसेच शरीराच्या हालचालीवरही परिणाम होतो.
झोपेत चालण्याचा आजार का होतो ?
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, एखाद्या व्यक्तीला झोपेत चालण्याचा आजार असेल तर त्यामागे हार्मोनल असंतुलन हेही कारण असू शकते. तसेच बऱ्याच काळापर्यंत झोपेची कमतरता, अँक्झायटीचा त्रास यामुळेही स्लीपवॉकिंची समस्या सहन करावी लागू शकते.
डॉक्टरांना दाखवणे कधी असते गरजेचे ?
अनेक वेळा असं होतं की तुम्ही झोपेत काहीतरी स्वप्न पाहत असता आणि तुमच्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाता. मात्र, यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही. डॉक्टर सांगतात की, जर एखाद्याला सतत झोपेत चालण्याची समस्या जाणवत असेल, तर त्यांनी ताबडतोब न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.
स्लीपवॉकिंग पासून कसा करावा बचाव ?
झोपेत चालणे टाळायचे असेल तर हेल्दी लाइफस्टाइल असणं खूप गरजेचं आहे. उदा. झोपण्याची आणि जागण्याची एक निश्चित वेळ ठरवावी. तसेच अँक्झायटीचा त्रास असेल तर मेडिटेशन, योगासने, डीप ब्रीदिंग यासारख्या सवयींचे पालन करावे. तसेच हार्मोनल असंतुलन सारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहाराचे नियमित सेवन करावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
