अमेरिकेचे 40000 सैनिक समुद्रात गायब, शोध सुरू, नेमकं काय घडलं?
अमेरिकेकडून समुद्रात गायब झालेल्या सैनिकांचा शोध सुरू आहे, त्यासाठी एक खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, या माध्यमातून आता समुद्रात बेपत्ता झालेल्या सौनिकांचा शोध घेतला जाणार आहे.

असा अंदाज वर्तवला जातो की, दुसऱ्या महायुद्धापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या लढायांमध्ये अमेरिकेचे जवळपास 40 हजारांपेक्षा जास्त सैनिक समुद्रात गायब झाले आहेत. युद्धादरम्यान जिथे-जिथे वायुदलाच्या विमानांचा आणि नौदलाच्या जाहाजांचा अपघात झाला तिथेच या मृत सैनिकांचे अवशेष सापडतील असा अंदाज आहे, त्यामुळे आता अमेरिकेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे, या मोहिमेचा एक भाग म्हणून अमेरिकेतले शास्त्रज्ञ आणि अमेरिकेच्या संरक्षण एजन्सीकडून संयुक्तपणे या मृत सैनिकांच्या अवशेषाचा शोध घेतला जात आहे. समुद्रात आतापर्यंत जे सैनिक गायब झाले आहेत, त्यांचा शोध घेणं या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी एक खास तंत्रज्ञानचा उपयोग करण्यात येणार आहे.
या तंत्रज्ञानाच्या मदतीनं समुद्राच्या तळाशी जे विखुरलेले सूक्ष्म कण आहेत, त्यांचे डिएनए गोळा करून हे निश्चित करण्यात येणार आहे की, इथे कधी काळी मानवी अवशेष होते की नाही? याबाबत सीएनएनने दिलेल्या एका रिपोर्टनुसार डीपीएएचे चीफ ऑफ इनोवेशन जेसी स्टीफन यांनी माहिती देताना सांगीतलं की, खोल समुद्रात संशोधन करणे हे खूप अवघड काम आहे. कारण पाण्यामध्ये अवशेष विखुरले जातात, त्यांचा शोध घेणं हे जवळपास अशक्य असतं त्यामुळेच आम्ही या खास तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही समुद्राच्या तळाशी विखुरलेल्या सूक्ष्म कणांचा डिएनए सॅम्पल गोळा करणार आहोत, आणि त्यामाध्यमातून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल की इथे कधी काळी मानवी अवशेष होते की नव्हते?
1944 साली अमेरिकेचं एक लढाऊ विमान ग्रुमन टीबीएफ अॅव्हेंजरचा भीषण अपघात झाला होता, हे विमान सायपनच्या समुद्रात कोसळलं होतं, हे विमान अजूनही सायपनच्या समुद्राच्या तळाशी आहे. आता हे विमान प्रचंड मोठ्या प्रवाळ खडकांनी वेढल गेलं आहे. 1944 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे लढाऊ विमान सायपनच्या समुद्रात कोसळलं होतं. या विमानामध्ये एकूण तीन सैनिक होते, दरम्यान त्यातील दोन सौनिक हे कधीच सापडले नाहीत, त्यांचाही शोध सुरू आहे, शास्त्रज्ञानी हे विमान जिथे कोसळलं होतं, तेथील गाळाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
