
Nepal Violence : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळ या देशात सध्या अराजक माजले आहे. बोकाळलेला भाष्ट्राचार आणि सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे या देशातील तरुणाईने संतापून थेट राजधानी काठमांडूवर कूच केली. तरुणांनी काठमांडूमध्ये असलेल्या संसद, मंत्र्यांची निवासस्थाने, पंतप्रधान, राष्ट्रपती यांची निवासस्थाने यांना आग लावली. या घटनेनंतर आता राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. आता लवकरच या देशात नवी सत्ता स्थापन होणार आहे. दरम्यान भारताच्या शेजारी राष्ट्रातच असा विध्वंस झाल्याने भारताने खबरदारी म्हणून नेपाळ-भारताच्या सीमाभागात बंदोबस्त वाढवला आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेता आता भारताला कमकुवत करण्यासाठीच नेपाळमध्ये अराजकता माजवण्यात आली असा खळबळजनक दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक अभय पटवर्धन यांनी केला.
अभय पटवर्धन टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळ बोलताना त्यांनी नेपाळमधील सद्यस्थिती आणि त्याचा भारतावर पडणारा परिणाम यावर भाष्य केले. हे भारताच्या विरोध असलेले एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. यामागे चीन आणि अमेरिका हे दोन असू शकतात. पण सध्यातरी हे चीनने केलेलं नाही असं वाटतं. कारण तिथे चीन समर्थित सरकार होतं. आधीच चीनच्या कम्युनिस्ट लोकांनी ओली यांना तिथे पंतप्रधान बनवलं होतं, असा दावा पटवर्धन यांनी केला.
तसेच, दुसरी गोष्ट म्हणजेतिथे सध्या आर्मीची वाटाघाटी सुरू आहे. कोणाला पंतप्रधान बनवायचं हे ठरवलं जात आहे. तिथे अचानक शहा यांचं नाव आलं आहे. ज्याप्रमाणे बंगलादेशमध्ये अचानकपणे मोहम्मद युनुस यांचे नाव आले होते. त्याच पद्धतीने शहा यांचेही नाव पंतप्रधानपदासाठी आले आहे. एक वर्ष झाले तरी बांग्लादेश या देशात अजूनही निवडणूक झालेली नाही. तिथे अजूनही लोकशाही पद्धतीने सरकार आलेले नाही. सध्या त्या देशात सैन्याचे राज्य आहे. पाकिस्तानमध्येही असेच झालेले आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीमम मुनीर याला अमेरिका आणि चीनच्या म्हणण्यावरून फिल्ड मार्शलची पदवी देण्यात आलेली आहे, असेही मत यावेळी पटवर्धन यांनी व्यक्त केले.
सध्या नेपाळमध्येही लष्कराचे राज्य असावे यासाठी अमेरिकेचा प्रयत्न आहे. कारण एकदा का छोट्या देशांमध्ये लष्कराचे राज्य आले की मग त्या देशात मोठ्या प्रमाणात शस्त्र विकता येतात. हा अर्थकारणाचाही खेळ आहे. अमेरिका हा देश भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे मंदीमध्ये जाताना दिसतोय. त्यामुळे अमेरिका हा डाव खेळत असावी. चीनमध्ये झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन या तिघांचे एकत्र येणे ट्रम्प यांना आवडलेले नाही, असेही मत पटवर्धन यांनी व्यक्त केले.