Nepal President Resigns : पंतप्रधानांनंतर आता थेट राष्ट्रपतींचा राजीनामा, नेपाळमध्ये मोठी अस्थिरता!
नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Nepal President Ramchandra Paudel Resigns : नेपाळमध्ये सध्या मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या देशातील तरुणांनी एकत्र येत येथील केपी शर्मा ओली यांचे सरकार उलथवून टाकले आहे. तरुणांच्या प्रचंड संतापामुळे केपी शर्मा यांनी आपल्या पंतप्रधानांचा राजीनामा दिला आहे. ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळची सत्ता तात्पुरती लष्कराच्या हातात गेली आहे. दरम्यान, या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा देताच आता राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नेपाळच्या महत्त्वाची अशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती अशा दोन्ही पदं रिक्त आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी काही तासांपूर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तरुणांचा संताप लक्षात घेता स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ते सध्या अज्ञात स्थळी गेले आहेत. तर दुसरीकडे सरकारच बरखास्त झाल्याने सध्या या देशातील परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रपती रामचंच्र पौडेल यांनीही आपल्या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या राजीनाम्यानंतर आता नेपाळच्या कारभाराचे सूत्र सध्यातरी लष्कराकडे आहे. लष्कराकडून भडकलेल्या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मंत्र्यांची घरे पेटवली, सगळीकडे धुराचे लोट
नेपाळमध्ये तरुणांनी देशाच्या संसदेवरही हल्ला केला आहे. संसदेला आग लावून देण्यात आली आहे. तसेच राजधानी काठमांडूमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलक तरुणांनी तोडफोड केली आहे. तसेच मंत्र्यांची घरे जाळून टाकण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवासस्थानावरही जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे तिथे सध्या कायदा आणि सुव्यस्था संपूर्णपणे ढासळ्याचे चित्र आहे. पतंप्रधान आणि राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर आता या आंदोलकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. तरीदेखील राजधानी काठमांडूमधील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. या शहरात सगळीकडे धुराचे लोट दिसत आहेत.
