अमेरिका होणार मालामाल; चीनला मोठा धक्का, ट्रम्प यांचा तो डाव यशस्वी? पुतिन यांच्या सोबत बैठकीपूर्वीच मोठी बातमी
15 ऑगस्टला डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यापूर्वीच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. चीनला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, हे युद्ध सुरू होऊन आता साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे, या युद्धामध्ये प्रचंड प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम होऊ शकतो, अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादीमीर पुतिन यांची बैठक होणार आहे. या बैठकीबाबत अमेरिकेकडून सकारात्मक प्रतिक्रिया समोर आली आहे, अमेरिका रशिया आणि युक्रेनमधील युद्धविरामाच्या मुद्द्यावर गंभीर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वीच आपण जर सत्तेवर आलो तर हे युद्ध थांबवू अशी घोषणा केली होती, मात्र त्यात त्यांना अजूनही यश आलेलं नाहीये.
ट्रम्प हे कोणत्याही परिस्थितीमध्ये रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवण्याच्या मुडमध्ये आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी आम्ही रशियाला आमची एक इंचही जमीन देणार नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की, जर गरज पडली तर अशाप्रकारची डील होऊ शकते. ट्रम्प हे युद्ध थांबवून व्यापाराची गोष्ट करतात, आताही त्यांना रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात व्यापाराची संधी दिसत आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीच युक्रेनसोबत दुर्मिळ खनिजासंदर्भातील एक करार केला आहे. रशियाकडून देखील त्यांना असाच करार अपेक्षित आहे, जो की युद्ध थांबवण्याच्या बदल्यात ट्रम्प हे रशियासोबत असा करार करू शकतात, ज्याचा अमेरिकेला मोठा फायदा होऊ शकतो, पुतिन यांना देखील हे युद्ध आता थांबवायचं असल्यानं ते अमेरिकेसोबत असा करार करू शकतात असा अंदाज आहे.
ट्रम्प रशियाकडे काय मागू शकतात?
अमेरिकेला सध्या रशियापेक्षाही चीनकडून सर्वात मोठा धोका आहे. विशेष: रेअर खनिज साधन संपत्तीच्या क्षेत्रामध्ये. या क्षेत्रात चीनचा मोठा दबदबा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची अशी इच्छा आहे की या क्षेत्रात अमेरिकेनं आपलं मजबूत स्थान निर्माण करावं. या वर्षाच्या सुरुवातीलाच अशा काही बातम्या समोर आल्या होत्या की, रशियानं जमिनितून खनिज काढण्यासाठी अमेरिकेला सहकार्य करू असं म्हटलं होतं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प या बैठकीमध्ये रशियाकडून आर्क्टिक संसाधनांची मागणी करू शकतात, तसेच तेलाच्या किमती कमी करण्याची मागणी करू शकतात, त्याचसोबत द्विपक्षीय व्यापारी करार देखील करू शकतात, यामधून अमेरिकेला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, अमेरिका मालामाल होऊ शकते, दुसरीकडे ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून डबल टॅरिफ लावला आहे, या मुद्द्याचा देखील ते या बैठकीत कुटनीती म्हणून वापर करू शकतात.
