Tarriff War : स्वतःच्या पायावर कुऱ्हाड.. भारताविरोधात ॲक्शननंतर ट्रम्पना घरचा आहेर, निर्णयाचा कडाडून विरोध
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड वुल्फ यांच्या मते, भारताबाबत कठोर भूमिका स्वीकारून अमेरिका स्वतःच्या हिताचे नुकसान करत आहे. ट्रम्प ब्रिक्स गटाला कमकुवत मानतात, तर ब्रिक्स पाश्चात्य आर्थिक वर्चस्वासाठी एक मजबूत पर्याय बनत आहे. टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होणार असून ब्रिक्स देशांचा प्रभाव वाढणार असल्याचेही ते म्हणाले.

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयाचे विविध पडसाद उमटत असून भारताने मात्र अमेरिकेच्या दादागिरीपुढे न झुकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प मात्र त्रासले असून त्यातच त्यांच्या या निर्णयाचा देशांतर्गतही विरोध होत असून अनेकांनी त्यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड वुल्फ यांनीही ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत त्यांना घरचा आहेर दिला आहे. भारतावर टॅरिफ लादू अमेरिका ‘कठोर माणूस’ असल्यासारखे वागत आहे, परंतु प्रत्यक्षात ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहे. असे केल्याने ट्रम्प प्रशासन हे ब्रिक्सला पश्चिमेकडील देशांना आर्थिक पर्याय बनण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, अशा शब्दांत वुल्फ यांनी ट्र्म्प यांच्या निर्णयावर टीका केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मते, भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. भारताने काय करावे हे अणेरिकेने सांगणे म्हणजे उंदराने हत्तीला बुक्का मारण्यासारखे आहे असा टोलाही वुल्फ यांनी हाणला.
टॅरिफमुळे अमेरिकेचे नुकसान
रशिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत वुल्फ म्हणाले की, जर अमेरिकेने भारतासाठी आपले दरवाजे बंद केले तर भारताला आपल्या वस्तू विकण्यासाठी इतर देश, पर्याय सापडतील आणि या पाऊलामुळे ब्रिक्स देश अधिक मजबूत होतील. ज्याप्रमाणे रशियाला आपले कच्चे तेल विकण्यासाठी दुसरे ठिकाण सापडले आहे, त्याचप्रमाणे भारतही ते इतर ब्रिक्स देशांना विकेल असा इशारा त्यांनी दिला.
जर चीन, भारत, रशिया आणि ब्रिक्स याबद्दल बोलायचं झालं तर एकूण जागतिक उत्पादनात या देशांचा वाटा 35% आहे. G7 चा वाटा सुमारे 28% पर्यंत कमी झाला आहे असं वुल्फ यांनी नमूद केलं.
10 उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समूह ब्रिक्स
ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. पाश्चात्य आर्थिक वर्चस्वाला तोंड देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. डॉलरला आव्हान देण्यासाठी देखील ब्रिक्स पर्याय शोधत आहे. ब्रिक्सची स्थापना 2009 साली झाली. भारत, चीन, रशिया आणि ब्राझील हे त्याचे संस्थापक सदस्य आहेत.
मात्र ट्रम्प यांनी अनेक वेळा ब्रिक्सला एक लहान गट म्हणून संबोधत त्यांना नाकारलं आहे. ब्रिक्स आता संपलयं असंही त्यांनी फेब्रुवारीमध्ये म्हटवलं होतं. जर ब्रिक्सने डॉलरऐवजी एक सामान्य चलन तयार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर 100% कर लादण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली होती.
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ वुल्फ म्हणाले की, सोव्हिएत युनियन काळापासून भारताचे अमेरिकेशी संबंध आहेत. तुम्ही एका वेगळ्या प्रतिस्पर्ध्याशी खेळत आहात. अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असल्यासारखे वागत आहे, पण प्रत्यक्षात ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
