पाकला नवं टेन्शन… पाकिस्तानी सैन्याला बीएलएफच्या महिला ब्रिगेड भिडल्या; 9 जवानांचा खात्मा
बलुचिस्तानमध्ये बीएलएफच्या करीमा आर्म्ड असॉल्ट डिव्हिजन (KAAD) या महिला ब्रिगेडने पाकिस्तानी सैन्यावर दोन मोठे हल्ले केल्याचा दावा केला आहे, ज्यात 9 जवान मारले गेले. जारी केलेल्या व्हिडिओंमध्ये ऑपरेशन आणि प्रशिक्षणाचे फुटेज दिसत आहेत. या नव्या घडामोडीमुळे पाकिस्तानला नवं टेन्शन मिळालं आहे.

बलोचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात पुन्हा एकदा हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. बलोचिस्तान लिबरेशन फ्रंटने (BLF) ची नवी महिला बंडखोर यूनिट करीमा आर्म्ड असॉल्ट डिव्हिजनचा (KAAD) एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या महिला यूनिटने बलोचिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन ऑपरेशन असून त्यात पाकिस्तानी सैन्याचे 9 जवान मारले गेले आहेत. अनेक जवान जखमी झाले आहेत, असा दावा बीएलएफने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महिला यूनिटने दुसरे ऑपरेशन कलात हे मंगोचर परिसरात केले, असा दावा बीएलएफने केला आहे. बीएलएफने जारी केलेल्या व्हिडिओत तुरबतच्या जोसाक परिसरात सीपीईसी रोडवर पाकिस्तानी सैन्याच्या क्विक रिअॅक्शन फोर्सच्या ताफ्यावर कथित हल्ला झाल्याचे फुटेज दाखवण्यात आले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात जीवित हानी झाल्याचा दावा करण्यात आलेला नाही. तसेच जीवित हानी झाल्याची कुणी पुष्टीही केलेली नाही.
महिला कमांडरना ब्रीफिंग
बीएलएफने जारी केलेल्या एका व्हिडीओत एक महिला कमांडर बंडखोरांना मिशनची माहिती देताना दिसत आहे. त्यानंतर काही बंडखोर सैन्याच्या वाहनांवर अगदी जवळून हल्ला करताना दिसत आहेत. व्हिडीओत KAAD च्या ट्रेनिंगशी संबंधित फुटेजही दाखवण्यात येत आहे.
कलातच्या मंगोचर परिसरातील वेगळ्या फुटेजमध्ये महिला बंडखोरांना वाहने रोखताना आणि त्याची तपासणी करताना दाखवलं आहे. बीएलएफने हे फोटो त्यांच्या महिला यूनिटची ट्रेनिंग आणि ऑपरेशनल क्षमतेची पुरावे म्हणून सादर केले आहेत.
KAAD बाबत BLFचा दावा काय?
अनेक वर्षाच्या ट्रेनिंगच्या तयारीनंतर KAAD ला एक संघटीत बंडखोर यूनिट म्हणून तयार करण्यात आलं आहे. हे यूनिट सातत्याने ऑपरेशनमध्ये उतरत आहे. यावरून बीएलएफमध्ये KAADची सक्रिय भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे, असंही बीएलएफने म्हटलंय.
बीएलएफचा पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात सशस्त्र संघर्ष सुरू आहे. बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आमच्या अधिकाराचं उल्लंघन केलं जात असल्याचा दावा बीएलएफने केला आहे. दरम्यान, बीएलएफच्या महिला यूनिटने जवानांना ठार मारल्याचं पाकिस्तानी सैन्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये.
