Sanjay Raut: राजकारणातील संघर्ष, ठाकरे कुटुंबाशी नातं अन् पडद्यामागच्या गोष्टी… संजय राऊतांचं चरित्र कोण लिहिणार? राऊतांनी ‘यांचं’ नाव सुचवलं
Sanjay Raut to Write Book on Balasaheb Thackeray: सध्या संजय राऊतांच्या 'भूतभजन' पुस्तकाची चर्चा होत आहेत. यानंतर ते बाळासाहेबांवरही चरित्र लिहिणार आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या आगामी पुस्तकाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘भूतभजन’ असं त्यांच्या नव्या पुस्तकाचं नाव आहे. जगभरातील भुतांच्या कथा, अज्ञात शक्ती आणि विविध विचारवंतांना आलेले अनुभव यांचा या पुस्तकात समावेश असणार आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारणावरही त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्याबाबतही पुस्तकात एक प्रकरण असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
१४ नोव्हेंबरला संजय राऊत यांचा वाढदिवस असतो. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, आपण स्वतः कधी वाढदिवस साजरा करत नाही. मात्र मनोज धुमाळ दरवर्षी वाढदिवस साजरा करतात. १४ नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंडित राऊत यांचा वाढदिवस असतो. यातील एक महान आणि दुसरा लहान, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
आपल्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, जगभरातील भुतांच्या कथा, अज्ञात शक्ती आणि विचारवंतांचे अनुभव यावर हे पुस्तक आधारित असेल. आपलेही काही अनुभव या पुस्तकात मांडण्यात येणार आहेत. देवाचं अस्तित्व मानणारे अनेकजण भुतांचं अस्तित्व नाकारतात, तर काहीजण भुतांवर विश्वास ठेवतात. या दोन्ही बाजूंचा वेध पुस्तकातून घेण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूनंतर व्हाइट हाऊसमध्ये त्यांचं भूत दिसल्याचे अनेक किस्से सांगितले जातात. अमेरिकेत यावर संशोधनही झाल्याचा उल्लेख राऊत यांनी केला. स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यांनीही अशा अनुभवांचा उल्लेख केल्याचं ते म्हणाले आहेत. हे पुस्तक गंभीर विषयावर असलं तरी त्याची मांडणी मनोरंजक स्वरूपात करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या पुस्तकात राजकीय संदर्भांचाही समावेश असेल. महाराष्ट्राच्या राजकारणातही काही भूतं असल्याचं सांगत त्यांनी सूचक विधान केलं. दिल्लीतलं सध्याचं सरकार गेल्यानंतरही कर्तव्य भवन आणि संसद परिसरात काही भूतं दिसतील, अशी टिप्पणी त्यांनी केली. नरेंद्र मोदी यांच्या ‘नॉन-बायोलॉजिकल’ विधानाचाही उल्लेख करत त्यावर संशोधन व्हायला हवं, असं राऊत म्हणाले. मोदी यांच्याबाबत पुस्तकात एक स्वतंत्र प्रकरण असल्याचंही त्यांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना संजय राऊत भावुक झाले. माझ्या आयुष्यात बाळासाहेबांचा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी माझं बोट धरून मला योग्य मार्गाने पुढे नेलं. त्यांचा आशीर्वाद आजही माझ्यासोबत असल्याचं मला जाणवतं, असं ते म्हणाले. बाळासाहेबांसोबत घालवलेले दिवस, त्यांचे स्वभाववैशिष्ट्य आणि आपण अनुभवलेले बाळासाहेब यावर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पत्नी आणि मुलीचीही तशी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण पाहिलेले बाळासाहेब इतरांपेक्षा वेगळे होते, असंही राऊत म्हणाले. आपल्या आत्मचरित्राबाबत विचारलं असता, माझ्यावर चरित्र लिहायचं झाल्यास ते राजू परुळेकर यांनी लिहावं, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
