राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय कोण घेणार? आतली बातमी फुटली, भुजबळांनी सगळंच सांगितलं
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आता छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. दरम्यान त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये जवळपास 35 मिनिट चर्चा झाली. दरम्यान त्यानंतर आता या विलिनीकरणाच्या चर्चेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते पुण्यात बोलत होते. पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये दोनदा शरद पवार यांची भेट घेतली आहे, यावर देखील यावेळी भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
एक एक जाऊन चर्चा करण्यापेक्षा सर्वांनी संघटितरित्या चर्चा करावी, नातं म्हणून भेटत असतील, चर्चा करत असतील तर मला माहित नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे माझे नेते आहेत. जे काही होईल ते व्यवस्थित व्हावं. रोज रोज उलट सुलट चर्चा होऊ नये यापेक्षा, ठाकरे घराणे एकत्रित आलं आणि पवार घराणे एकत्रित आलं तर मला आनंद आहे. सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत, तोपर्यंत विलिनीकरणाला यश येणार नाही, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.
पार्थ पवार आणि शरद पवार यांची भेट
दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पार्थ पवार यांनी दोनदा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे या भेटीला देखील महत्त्व प्राप्त झालं आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची देखील शुक्रवारी भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.
