पेरलं तेच उगवलं… ट्रेन हायजॅक झाली अन् 200 हून अधिक शवपेट्या पोहोचल्या; अजून 100 हून अधिक प्रवाशांचा जीव टांगणीला
पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीने केलेल्या रेल्वे अपहरणाच्या घटनेत 200 प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत, तर 100 प्रवासी अजूनही दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. पाकिस्तानी सैन्याने बचावकार्य राबवले आहे, परंतु दहशतवाद्यांनी बंधकांमध्ये आत्मघातकी बॉम्बर्स ठेवले असल्याने बचावकार्य अवघड झाले आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पाकिस्ताननं जे पेरलं तेच उगवलंय. पाकिस्तानने आपल्या फायद्यासाठी दहशतवाद पोसला. आज तेच दहशतवादी पाकिस्तान समोर काळ बनून उभे आहेत. बलूचिस्तान येथील अतिरेक्यांनी काल पाकिस्तानची एक ट्रेन हायजॅक केली. पाकिस्तानी सैन्याने या ट्रेनमधील प्रवाशांना सोडवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. दहशतवाद्यांसोबत चकमकही उडाली. त्यात 16 दहशतवादी मारले गेले. पण प्रवाशांची काही सुटका होऊ शकली नाही. उलट आज पाकिस्तान सरकारने 200 हून अधिक शवपेट्या बलूचिस्तानची राजाधानी क्वेटा शहरात पाठवल्या आहेत. याचाच अर्थ अतिरेक्यांनी 200 प्रवाशांचा खात्मा केला आहे. अजूनही अतिरेक्यांच्या ताब्यात 100 प्रवाशी असून त्यांचाही जीव टांगणीला लागलेला आहे.
पाकिस्तान रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. बलूचिस्तानच्या बोलन येथे पाठवण्यासाठीच्या 200 शवपेट्या क्वेटाला रवाना झाल्या आहेत, असं हा अधिकारी म्हणाला. ट्रेन हायजॅकच्या घटनेला आतापर्यंत 28 तास उलटले आहेत. अजूनपर्यंत पाकिस्तानच्या सैन्याला सर्व बंदींना सोडवता आलं नाही.
27 दहशतवादी मारल्याचा दावा
पाकिस्तानी मीडियाने काही तासापूर्वी एक मोठा दावा केला आहे. मीडियाच्या मते, 155 प्रवाशांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. रेस्क्यू ऑपरेनमध्ये बलोच लिबरेशन आर्मीचे 27 दहशतवादी मारले गेले आहेत. जाफर एक्सप्रेसमधील 100 हून अधिक प्रवासी शस्त्रधारींच्या ताब्यात आहेत. बीएलएने शेवटची अपडेट देताना 30 पाकिस्तानी नागरिकांना मारल्याचा दावा केला आहे. मात्र, बीएलएकडून अद्याप कोणतीही आकडेवारी जारी करण्यात आलेली नाही.
बंदीवानांसोबत सुसाइड बॉम्बर्स
पाकिस्तानी सैन्याकडून बंदीवानांची सुटका करण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे. पण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनंत अडचणी येत आहेत. बीएलएने बंदीवानांच्यामध्ये सुसाइड बॉम्बर्स बसवले आहेत. या बॉम्बर्सनी सुसाईड जॅकेट घातली आहे. त्यामुळेच सुरक्षा दलाला या प्रवाशांची सुटका करणं कठिण झालं आहे.
त्यानंतर प्रवाशांचं अपहरण
बलोच आर्मीने ट्रेन हायजॅकचा एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात अनेक गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहेत. ट्रेन सामान्य वेगाने जाते. तेवढ्यात धमाका होतो. त्यामुळे ट्रेन थांबते. ट्रेन जिथे थांबली तिथल्या आजूबाजूच्या डोंगरता बीएलएचे दहशतवादी हातात बंदुका घेऊन दिसत आहेत. या व्हिडीओत हा देखावा स्पष्ट दिसत आहे. जाफर एक्सप्रेस काल 11 मार्च रोजी सकाळी 9 वाजता पेशावरसाठी रवाना झाली होती. ट्रेन दुपारी 1.30 वाजता सिब्बी स्टेशनला आली. पण बेलनच्या माशफाक टनलच्या जवळ ट्रेनवर हल्ला करण्यात आला.