भारताकडून बांगलादेशला मोठा झटका; या वस्तूंच्या आयातीवर लादले निर्बंध
बांगलादेशमध्ये अलिकडे राजकीय बदल झाल्यानंतर भारतासोबतच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पायउतार झाल्यानंतर आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत.

बांगलादेशातील सत्ताबदलानंतर युनूस सरकार आणि भारत यांच्यातील संबंध अधिकाधिक कटू होत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने शनिवारी बांगलादेशातून तयार कपड्यांची (आरएमजी) आयात फक्त कोलकाता आणि न्हावा शेवा या दोन सागरी बंदरांपर्यंत मर्यादित केली. याचसोबत भारताने ईशान्येकडील राज्यांसाठी 11 भू-सीमा चेकपोस्टवरून ग्राहकोपयोगी वस्तूंच्या आयातीवरही बंदी घातली आहे. बांगलादेशने भारतीय निर्यातीवर लादलेल्या निर्बंधाना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की आता बांगलादेशातून RMG आयात फक्त कोलकाता आणि न्हावा शेवा या दोन बंदरांमधूनच करता येईल.
बांगलादेशविरोधात भारताचं ठोस पाऊल
बांगलादेशाची भारतात होणारी वार्षिक आरएमजी निर्यात सुमारे 700 दशलक्ष डॉलर इतकी आहे. त्यापैकी आतापर्यंत 93% माल हा जमिनीच्या मार्गाने येत असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारताच्या सीमेवरील भू-बंदरांवर बांगलादेशने लादलेल्या निर्बंध आणि आयात तपासणीमुळे भारताने हे पाऊल उचललं आहे. बांगलादेशने 13 एप्रिलपासून धाग्याच्या आयातीवर बंदी घातली आहे, तर 15 एप्रिलपासून हिली आणि बेनापोल एकात्मिक तपासणी नाक्यांवर (IPC) भारतीय तांदळाची आयात थांबवण्यात आली आहे.
बांगलादेशने भारतीय वस्तूंवर प्रति टन प्रति किलोमीटर 1.8 रुपये इतका अन्याय्यपणे जास्त ट्रान्झिट शुल्क लादल्याचा भारताचा आरोप आहे. ज्यामुळे बांगलादेशी हद्दीतून भारतीय वस्तूंच्या वाहतुकीच अडथळा निर्माण होत आहे. तसंच ईशान्येकडील राज्यांमधून स्थानिक पातळीवर उत्पादित वस्तूंचा बांगलादेशी बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यावरही परिणाम झाला आहे.
या वस्तूंच्या आयातीवर लादले निर्बंध
रेडीमेड कपड्यांव्यतिरिक्त बंदी घातलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये प्लास्टिक आणि पीव्हीसी उत्पादनं, लाकडी फर्निचर, फळांची आणि कार्बोनेटेड पेये, बेकरी, कापसाशी संबंधित टाकाऊ वस्तू आणि मिठाई उत्पादनं यांचा समावेश आहे. हे सर्व आता मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोरम आणि पश्चिम बंगालमधील 11 नियुक्त सीमा चौक्यांमधून भारतात प्रवेश करू शकणार नाहीत. भूतान आणि नेपाळला पाठवल्या जाणाऱ्या बांगलादेशी वस्तूंवर हे निर्बंध लागू होणार नाहीत, असंही भारताने स्पष्ट केलंय. ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि निष्पक्ष व्यापार सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. “भारताने नेहमीच परस्पर आणि निष्पक्षतेच्या आधारावर व्यापार केला आहे, परंतु बांगलादेशने आमच्या सद्भावनेला प्रतिसाद दिला नाही”, असं ते म्हणाले. 2023-24 या आर्थिक वर्षात भारत आणि बांगलादेशमधील एकूण व्यापार हा 12.9 अब्ज डॉलर्स होता. ज्यामध्ये भारताकडून बांगलादेशला होणारी निर्यात 11.06 अब्ज डॉलर्स आणि बांगलादेशातून होणारी आयात 1.8 अब्ज डॉलर्स होती.
