भारताच्या या मित्र देशात ‘यादवी’? माजी राष्ट्राध्यक्ष नजरकैदेत; मोठे टॅरिफ लादत ट्रम्प यांची वादात उडी, जगाच्या या कोपऱ्यात वेगवान घडामोडी
House Arrest : जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात राजकीय अस्वस्थता आणि वाद उफाळून आले आहेत. जगात दोन युद्ध सुरू आहे. काही देशांमध्ये धुसफूस सुरू आहे. तर भारताच्या या मित्र देशात 'यादवी' होण्याच्या शक्यतेने बड्या घडामोडी घडत आहेत. काय आहे ही वार्ता?

भारताचे मित्र राष्ट्र आणि ब्रिक्सचा सक्रीय सदस्य ब्राझीलमध्ये बड्या घडामोडी घडत आहे. सोमवारी देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष जयर बोलसोनारो यांना नजरकैद (House Arrest) करण्यात आले. 2022 मध्ये त्यांचा सडकून पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी देशात सत्तापालट करण्याचे षडयंत्र रचल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा या वादात उतरले आहे. अमेरिका आणि ब्राझील यांच्यात सुद्धा ट्रे़ड वॉर पेटले आहे. त्यामुळे दक्षिण अमेरिकेत घडामोडींना वेग आला आहे.
सुप्रीम कोर्टाची तिखट टिप्पणी
जयर बोलसोनारो यांच्याशी संबंधित प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सरन्यायाधीश ॲलेक्झांडर डी मोरेस यांनी प्रकरणात माजी राष्ट्राध्यक्षांवर तिखट टिप्पणी केली आहे. 70 वर्षीय बोलसोनारो यांनी कोर्टाने जे निर्देश दिले, त्याचे उल्लंघन केल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्यी तीनही खासदार मुलांच्या खात्यावरून जो कंटेंट पोस्ट केला तो नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. रविवारीच बोलसोनारो यांनी रियो दी जेरेरिया याठिकाणी त्यांच्या समर्थकांशी मोबाईलवरून संपर्क साधला.
ट्रम्प यांच्या मनात काय?
बोलसोनारो यांच्याविषयीचा खटला आता अधिक चर्चेत आला आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी या दक्षिण अमेरिकन देशाच्या राजकारणात लुडबूड सुरू केली आहे. बोलसोनारो हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानण्यात येतात. हा खटला विच हंट आहे, तो खोटा असल्याचा दावा ट्रम्प करत आहे. त्यांनी हा खटला चालवला म्हणून ब्राझिलवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्यामुळे ब्राझीलची जनता संतापली आहे.
बोलसोनारो यांचा यादवीचा प्रयत्न?
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लूला दा सिल्वा सह इतर अनेक नेत्यांनी या घडामोडींवर थेट प्रतिक्रिया नोंदवली आहे. बोलसोनारो हे देशात यादवी माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विरोधात निकाल लागल्यापासून बोलसोनारो यांनी गुन्हेगारी संघटन सुरू केले असून त्यांना राष्ट्राध्यक्ष लूला आणि सरन्यायाधीश डी मोरेस यांच्या हत्येचा प्रयत्न चालवल्याचा खळबळजनक दावा करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींना ट्रम्प यांची फूस असल्याचा गंभीर आरोप ही वर्तमान सरकारचे समर्थक करत आहेत. ब्राझीलच्या फेडरल पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर जअर बोलसोनारो यांनी ब्रासिलिया येथील त्यांच्या घरात नजरकैद केले आहे. त्यानंतर आता ट्रम्प हे काय भूमिका घेतात याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
