VIDEO | भलामोठा खडक बोटीवर कोसळला, भीषण अपघातात सात जणांना जलसमाधी

खडकांचा बुरुज अचानक उंच डोंगर कड्यावरुन तुटला. त्याखालून तलावातून जाणाऱ्या दोन मोटरबोटवर हा खडक कोसळल्याने अपघात झाला. त्यानंतर मोठा धुरळा उडाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

VIDEO | भलामोठा खडक बोटीवर कोसळला, भीषण अपघातात सात जणांना जलसमाधी
ब्राझीलमध्ये बोट दुर्घटना

ब्राझिलिया : धबधब्याजवळील भलामोठा खडक कोसळून ब्राझिलमध्ये (Brazil) झालेल्या भीषण अपघातात किमान सात जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. तलावात मोटरबोटमधून पर्यटक फिरत असताना अचानक महाकाय खडक कोसळला आणि अनेक जणांना जलसमाधी मिळाली. दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये सुल मिनास (Sul Minas) येथे स्थानिक वेळेनुसार शनिवारी भरदिवसा ही घटना घडली. दुसऱ्या बोटीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्याने या प्रकाराचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिनास जरेस (Minas Gerais) राज्यातील कॅपिटोलिओ कॅन्यन्स (Capitolio Canyons) या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर हा अपघात झाला. खडकांचा बुरुज अचानक उंच डोंगर कड्यावरुन तुटला. त्याखालून तलावातून जाणाऱ्या दोन मोटरबोटवर हा खडक कोसळल्याने अपघात झाला. त्यानंतर मोठा धुरळा उडाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अपघातानंतर बोट पाण्यात उलटल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सात जण ठार, तिघे बेपत्ता, अनेक जखमी

अपघातानंतर तिघे जण अद्यापही बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात येत आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची हाडं मोडली, तर एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. किमान 23 जणांना किरकोळ दुखापती झाल्याचं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलं आहे. ब्राझीलियन नेव्हीने या घटनेची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. दोन आठवड्यांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळेच खडकाचा सुळका सैल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

ट्रकच्या धडकेत लातूर-औरंगाबाद बसचा चेंदामेंदा, भीषण अपघातात सहा जण जागीच ठार, आठ गंभीर

मुरुडमध्ये रिक्षा उलटून अपघात, डोंबिवलीकर दाम्पत्याचा करुण अंत

Published On - 3:10 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI