Russian oil Purchase : मोदींनी आश्वासन दिलय मग ट्रम्प यांनी भारताला पुन्हा टॅरिफची धमकी का दिली?
Russian oil Purchase : डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे भारतविरोधी निर्णयांची मालिका चालवली आहे. एकीकडे त्यांनी भारतावर मोठा टॅरिफ आकारला आहे. दुसरीकडे ते पाकिस्तानला जवळ करत आहेत. भारत आणि अमेरिकेत ट्रेडची बोलणी अजूनही सुरुच आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली नाही, तर अजून जास्त टॅरिफ लावेन असा इशारा ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. रशियाकडून तेल आयात बंद करणारं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला व्यक्तीगत आश्वासन दिलय असा दावा ट्रम्प यांनी केला. Air Force One मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला आश्वासन दिलय की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. त्यांनी तेल खरेदी सुरुच ठेवली तर भारी टॅरिफ चुकवावा लागेल” असं ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मोदी आणि तुमच्यात कुठली चर्चा झाली, या बद्दल माहिती नाहीय, असं भारत सरकारने उत्तर दिलय. त्यावर ट्रम्प म्हणाले की, “जर त्यांना असं म्हणायचं असेल तर त्यांना भारी टॅरिफ द्यावा लागेल. जर त्यांचं असं उत्तर असेल, तर त्यांना टॅरिफ हा द्यावाच लागेल.
बुधवारी ओव्हल ऑफिसमधून ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा झाल्याचं थेट जाहीर केलं होतं. भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करेल, असं पंतप्रधान मोदींनी मला आश्वासन दिलय असा थेट दावा ट्रम्प यांनी केला. भारताला जवळपास एक तृतीयांश तेल रशियाकडून मिळतं असं ट्रम्प म्हणाले. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे रशियाला युक्रेन विरोधात युद्ध लढण्यासाठी बळ मिळतय असा ट्रम्प यांचा दावा आहे. म्हणून त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावलाय.
भारताची भूमिका काय?
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल म्हणाले की, ‘ट्रम्प आणि मोदी यांच्यात कुठली चर्चा झाल्याची आपल्याकडे माहिती नाही’ जायस्वाल म्हणाले की, भारत आणि अमेरिकेत ऊर्जा सहकार्यावर चर्चा सुरु आहे. पण नवी दिल्ली रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्याला दुजोरा दिला नाही. ते पुढे म्हणाले की, यूएस सोबत ऊर्जा संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा सुरु आहे.
अमेरिकेची ही दादागिरी जुमानलेली नाही
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे भारतविरोधी निर्णयांची मालिका चालवली आहे. एकीकडे त्यांनी भारतावर मोठा टॅरिफ आकारला आहे. दुसरीकडे ते पाकिस्तानला जवळ करत आहेत. भारत आणि अमेरिकेत ट्रेडची बोलणी अजूनही सुरुच आहेत. ही बोलणी यशस्वी झालेली नाहीत. आता ट्रम्प यांनी थेट भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावा केला आहे. भारताने अजूनपर्यंत अमेरिकेची ही दादागिरी जुमानलेली नाही.
