Donald Trump: निर्णय घेण्यास उशीर करू नका, अन्यथा…, डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला शेवटचा अल्टिमेटम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता ट्रम्प यांनी शांतता योजनेबाबत हमासला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता ट्रम्प यांनी शांतता योजनेबाबत हमासला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. हमासने उशीर करू नये आणि ताबडतोब निर्णय घ्यावा, अन्यथा अटी मान्य नाहीत असे मानले जाईल. मला उशीर नको आहे. हमासने लढाई थांबवावी आणि शस्त्रे खाली ठेवावीत अन्यथा सगळं काही नष्ट केलं जाईल. त्यामुळे आता हमास काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली, यात त्यांनी म्हटले की, ‘ओलिस ठेवलेल्यांची सुटका आणि शांतता करार पूर्ण करण्यासाठी इस्रायलने बॉम्बहल्ला थांबवला आहे याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हमासने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा सर्वकाही धुळीस मिळेल. मला विलंब नको आहे. गाझाला अडचणीत आणणारा निकाल मला नको आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर निर्णय घ्या, सर्वांना न्याय दिला जाईल.’
याआधी शुक्रवारी ट्रम्प यांनी हमासला रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इस्रायलसोबत शांतता करार करण्याचा इशारा दिला होता. ट्रम्प म्हणाले होते की, आम्ही दिलेल्या शांतता योजनेचा स्वीकार करण्याची आणि इस्रायली बंधकांना सोडण्याची ही हमासला शेवटची संधी आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी हमासला अखेरचा इशारा दिला आहे.
पॅलेस्टिनी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझा शहरात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी हमासला हा इशारा दिला आहे. मात्र इस्रायल संरक्षण दलाने या हवाई हल्ल्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. तर अल-शिफा हॉस्पिटलचे संचालक मोहम्मद अबू सेल्मिया यांनी इस्रायली हल्ले कमी झाल्याची माहिती दिली आहे.
ट्रम्प यांच्या शांतता योजनेत भविष्यातील गाझा सरकारमध्ये हमासची कोणतीही भूमिका असणार नाही या मुद्द्याचा समावेश आहे, मात्र हमासने हा मुद्दा स्वीकारलेला नाही किंवा पूर्णपणे नाकारलेला नाही. हमास सहमतीने आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवू इच्छित आहेत. तसेच इतरही काही मुद्द्यांवर हमासने असहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता हमास ही योजना स्वीकारणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
