Donald Trump Tariffs : भारतासाठी सर्वात मोठी खुशखबर, टॅरिफ 15 टक्क्यांनी कमी होणार, डोनाल्ड ट्रम्प लवकरच…
टॅरिफ कमी करण्यासाठी लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर भारतावरील टॅरिफ 15 टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

America Tariffs : भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या तणावाची स्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केल्यामुळे भारताला फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा टॅरिफ कमी व्हावा यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. अमेरिका-भारत यांच्यात व्यापार वाढवण्यासंदर्भात बैठका चालू आहेत. असे असतानाच आता भारताला मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. लवकरच अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . विशेष म्हणजे भारतावर लादण्यात आलेला टॅरिफ 15 ते 16 टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून लादण्यात आलेला भारतावरील टॅरिफ कमी होण्याची शक्यता आहे. हा टॅरिफ 15 ते 16 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. सध्या अमेरिकेने भारतावरील वस्तूंवर 50 टक्के कर लावलेला आहे. यातील 15 टक्के टॅरिफ जरी कमी झाला तरी भारतातील निर्यात फायदेशीर ठरू शकते, असे म्हटले जात आहे. हा टॅरिफ कमी करण्यासाठी मात्र भारताला अमेरिकेसोबत व्यापारविषयक काही करार करावे लागणार आहेत.
अमेरिकेने भारतावर अगोदर 25 टक्के टॅरिफ लावला होता. नंतर भारत रशियाकडून करत असलेल्या कच्च्या तेलाच्या खरेदीचा हवाला देत अमेरिकेने हा टॅरिफ आणखी 25 टक्क्यांनी वाढवला होता. भारताने रशियासोबतचा तेल खरेदीचा व्यवहार कमी करावा. तसेच अमेरिकेसोबतचा व्यापार वाढवावा असे ट्रम्प यांचे मत आहे. सध्या भारत रशियाकडून एकूण गरजेच्या 34 टक्के तेल आयात करतो. याच कारणामुळे अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादलेला आहे.
आता भारत अमेरिकेकडून काय खरेदी करणार?
अमेरिकेने लादलेला टॅरिफ कमी करायचा असेल तर भारताला अमेरिकेकडून काही वस्तूंची आयात करावी लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार याच कराराचा एक भाग म्हणून भारत अमेरिकेकडून नॉन जनेटिकली मॉडीफाईड मका आणि सोयाबीन आयात करू शकतो. या व्यापाराच्या बदल्यात अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करू शकतो. भारतातील पोल्ट्री, डेअरी, इथेनॉल उद्योगाचा विस्तार लक्षात घेऊन भारत अमेरिकेकडून मका आणि सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेऊ शकतो. असे झाल्यास अमेरिकाचा भारतासंदर्भातला दृष्टीकोन बदलेल आणि लवकरच 15 टक्के टॅरिफ कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
