Donald Trump : हुकूमशाहा किंम जोंगपुढे डोनाल्ड ट्रम्प झुकले, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याच्यासोबत कोणतीही अट न ठेवता अणुकार्यक्रमावर चर्चा करायला तयार आहेत.

Donald Trump : सध्याच्या जागतिक राजकारणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे केंद्रस्थानी आहेत. युक्रेन-रशिया यांच्याती युद्ध थांबवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यातही त्यांना यश येण्याची शक्यता आहे. आपले इप्सित साध्य करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प काही देशांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न करतात. या दबावापुढे झुकून काही देश ट्रम्प यांच्यापुढे नमते घेतात. परंतु उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन हा यात अपवाद म्हणावा लागेल. मिळालेल्या माहितीनुसार डोन्लाड ट्रम्प हे पहिल्यांदाच कोणतीही पूर्वअट न ठेवता किम जोंग उन याच्याशी चर्चा करायला तयार झाले आहेत. ट्रम्प यांना किम जोंग याच्यापुढे झुकावे लागले आहे.
कोणतीही अट न ठेवता भेटण्यास तयार
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याच्यासोबत कोणतीही अट न ठेवता अणुकार्यक्रमावर चर्चा करायला तयार आहेत. दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योन्हापने अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार किम जोंग उन याच्याशी चर्चा करण्यासाठी यावेळी ट्रम्प यांच्याकडून कोणतीही पूर्वअट ठेवली जाणार नाही. ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात येत्या 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळात बैठक होण्याची शक्यता आहे. या काळात आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य परिषद (APEC) होणार आहे याच परिषदेच्या काळात ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
पहिल्यांदाच कोणतीही अट न ठेवता चर्चा
व्हाईट हाऊसच्या एका आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनसार ट्रम्प उत्तर कोरियासोबत कोणतीही पूर्वअट न ठेवता चर्चा करण्यास तयार आहेत. अमेरिका अशा प्रकारची भूमिका पहिल्यांदाच घेत आहे. याआधी उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेने नेहमीच काही पूर्वअटी ठेवलेल्या आहेत. या पूर्वअटींसोबतच आम्ही उत्तर कोरियाशी चर्चा करू अशी अमेरिकेची भूमिका राहिलेली आहे. असे असताना आता ट्रम्प पहिल्यांदाच कोणतीही अट न ठेवता चर्चा करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
याआधीही झालेली आहे दोन्ही नेत्यांत भेट
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत किम जोंग उन याची भेट घेतलेली आहे. माझ्या या बैठकांमुळे कोरियाई द्विपांमध्ये शांतता नांदण्यास मदत झाली, असे ट्रम्प यांचे मत आहे. संवाद आणि थेट चर्चा हाच तणाव कमी करण्याचा योग्य मार्ग आहे, असे ट्रम्प यांचे मत आहे.
ट्रम्प यांचा फायदा काय?
किम जोंग उन यानेदेखील उत्तर कोरियाच्या संसदेत ट्रम्प यांच्यासोबतची भेट चांगली होती, अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. दरम्यान आपला राजकीय फायदा लक्षात घेता ट्रम्प यांनी अशी भूमिका घेतली असावी, असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. उत्तर कोरियाशी चर्चा झाल्यास ट्रम्प एक बलशाली जागतिक नेते म्हणून नावारुपाला येऊ शकतात, असे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे मत आहे. दुसरीकडे किम जोंग उन यांनादेखील अमेरिकेसोबतचे आपले संबंध सुधारण्यासाठी ही एक चांगली संधी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य बैठकीत नेमकं काय काय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.
