भारताचं नाव घेत टॅरिफची भाषा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने पुन्हा खळबळ, पाकिस्तानचा उल्लेख करत…

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी एक जुन्या प्रश्नावर भाष्य केले आहे. मी गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले होते असं म्हणत त्यांनी टॅरिफचाही उल्लेख केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारताचं नाव घेत टॅरिफची भाषा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने पुन्हा खळबळ, पाकिस्तानचा उल्लेख करत...
Trump Modi
Image Credit source: Google
| Updated on: May 01, 2026 | 5:04 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी टॅरिफ बॉम्ब टाकत संपूर्ण जगाची झोप उडवली होती. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक जुन्या प्रश्नावर भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी पुन्हा सांगितले की, मी गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले होते. जेव्हा भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली होती. त्यावेळी मी हे युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत आणि पाकिस्तानातील संघर्षाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध होण्याची शक्यता होती, जी मी रोखली. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हाणाले की, मी आतापर्यंत आठ युद्धे थांबवली आहेत आणि भारत-पाकिस्तान त्यापैकी एक आहे. जवळजवळ प्रत्येक वेळी त्या देशांनी मला धन्यवाद दिले आणि नोबेल समितीलाही पत्र लिहिले.’

मी अनेकांचा जीव वाचवला – ट्रम्प

पुढे बोलताना ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख केला आणि म्हटले की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितले की मी 30 ते 50 दशलक्ष लोकांचे प्राण वाचवले. पण हा आकडा याहून अधिक असू शकतो कारण दोन अण्वस्त्रधारी देश लढत होते. 11 विमाने पाडली गेली होती. मी हे टॅरिफच्या माध्यमातून थांबवले. मी सांगितले होते की जर तुम्ही लढाई थांबवली नाही, तर मी तुमच्यावर टॅरिफ लावेन.’ याआधीही ट्रम्प यांनी अशा प्रकारचे अनेक दावे केले होते. पाकिस्तानने या दाव्याला पाठिंबा दिला होता, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांना आभारपत्रही पाठवले होते, मात्र भारताने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला

भारताने स्पष्ट केले होते की, दोन्ही देशांमध्ये DGMO स्तरावर झालेल्या थेट चर्चेनंतरच युद्धविरामाचा निर्णय झाला होता. त्यापूर्वी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये घुसून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यांना भारतीय सशस्त्र दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या अनेक एअर डिफेन्स प्रणाली नष्ट केल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भारताने कोणत्याही इतर देशाच्या दबावाखाली ऑपरेशन थांबवले नव्हते अशी माहिती दिली होती.

Follow Us