Earthquake : भारताच्या शेजारी देशात भूकंपाने भयाण अवस्था, झटक्यात सगळं उद्धवस्त, 250 नागरिकांचा मृत्यू
Earthquake : भारताच्या शेजारी देशात रविवारी रात्री उशिरा मोठा भूकंप आला. या भूकंपाने सगळचं हिरावून नेलं. होत्याच नव्हतं झालं. क्षणार्धात घर मातीच्या ढिगाऱ्यामध्ये बदलली. 250 नागरिकांचा मृत्यू झाला. 500 च्या वर लोक जखमी आहेत.

अफगाणिस्तानला रविवारी रात्री उशिरा 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. अमेरिकी भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानच्या सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानच्या भागाला भूकंपाचे झटके बसले. यूएसजीएसनुसार भूकंपाच केंद्र नंगरहार प्रांतात जलालाबादच्या जवळ आहे. या भूकंपामुळे अफगाणिस्तानातात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे. नांगहार प्रांतात 250 नागरिकांचा मृत्यू झाला असून 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यानंतर अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्यांमध्ये बदलली.
अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भूकंपाची तीव्रता इतकी होती की, भारताच्या काही भागात दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. त्याशिवाय पाकिस्तानातही काही भागात भूकंपाचे झटके बसले. नांगहार प्रांतातच 20 मिनिटानंतर दुसरा भूकंप आला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 होती. खोली 10 किलोमीटर होती. रविवारी स्थानिक वेळेनुसार हा भूकंप 11.47 वाजता आला.
याआधीच्या भूकंपात 4000 लोकांचा मृत्यू
7 ऑक्टोंबर 2023 रोजी अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. तालिबान सरकारच्या अंदाजानुसार त्यावेळी 4000 नागरिकांचा मृत्यू झाला होता. सयुंक्त राष्ट्राने मृताचा आकडा कमी जवळपास 1500 सांगितला होता. अफगाणिस्तानात असे भूकंपाचे धक्के येत असतात.
Notable quake, preliminary info: M 6.0 – 27 km ENE of Jalālābād, Afghanistan https://t.co/hE9lf5oIhx
— USGS Earthquakes (@USGS_Quakes) August 31, 2025
भूकंप येण्याची ही पाचवी वेळ
अफगाणिस्तानात मागच्या महिन्याभरात भूकंप येण्याची ही पाचवी वेळ आहे. भूकंपाच्या दृष्टीने हा संवेदनशील भाग आहे. 27 ऑगस्टला 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा, 17 ऑगस्टला 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.
हिंदूकुश पर्वत रांगांचा भाग
भूकंप रिश्टर स्केलवर मोजला जातो. त्याला रिक्टर मॅग्नीट्यूड टेस्ट स्केल म्हणतात. रिक्टर स्केलवर भूकंप 1 ते 9 च्या आधारावर मोजला जातो. भूकंपाच्यावेळी पृथ्वीच्या पोटातून तप्त ऊर्जा बाहेर निघते. रेड क्रॉसनुसार, अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वत रांगांचा भाग भूवैज्ञानिक दृष्टीने खूप सक्रीय आहे. तिथे दरवर्षी भूकंप येत असतात. हा भाग भारतीय आणि यूरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सवर आहे. एक फॉल्ट लाइन थेट हेरातमधून जाते.
