कोरोना स्ट्रेनला जग का घाबरतंय? आणि कोरोनाचं हे नवं रुप आहे तरी काय? सगळ्या प्रश्नांची सखोल उत्तरं!

कोरोना विषाणूच्या काही म्युटेशनमध्ये मानवांना संक्रमित करण्याची क्षमता वाढलेली पाहायला मिळत आहे.

कोरोना स्ट्रेनला जग का घाबरतंय? आणि कोरोनाचं हे नवं रुप आहे तरी काय? सगळ्या प्रश्नांची सखोल उत्तरं!


मुंबई : कोरोना स्ट्रेन… (Corona Strain) सध्या जगाला या शब्दानं चांगलीच भीती घातली आहे. पण हा कोरोना स्ट्रेन म्हणजे काय? आणि यापासून जगभरातले सगळे देश का घाबरले आहेत? कुठलं कारण आहे की भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या सगळ्या विमानांवर बंदी घातली आणि जगभरात बनलेल्या लसी या कोरोना स्ट्रेनला रोखू शकतात का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहेत, याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा प्रयत्न (Everything to know about New coronavirus strain in UK)

सगळ्यात आधी प्रश्न की हा कोरोना स्ट्रेन म्हणजे काय?

कोरोना स्ट्रेन हे कोरोनानं घेतलेलं नवं रुप मानलं जात आहे. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचं हे रुप पाहायला मिळालं होतं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचे जितके रुग्ण सापडले, त्यांच्या एक तृतीशांश लोकांमध्ये हा नवा कोरोना सापडला. तर डिसेंबर महिन्यात याचं प्रमाण झपाट्यानं वाढलं आणि सापडणाऱ्या 3 पैकी 2 रुग्णांमध्ये नवा विषाणू सापडू लागला. यावरुनच हा संसर्गाच्या बाबतीत अतिशय घातक असल्याचं समोर आलं. आधीच्या कोरोनापेक्षा 70 टक्के अधिक क्षमतेनं हा लोकांना संक्रमित करतो आहे. नॉर्दन आयर्लंड सोडलं तर सगळ्या ब्रिटनमध्ये या कोरोना स्ट्रेनचा फैलाव झाल्याचं पाहायला मिळतंय.

नव्या कोरोना स्ट्रेनमुळे धोका वाढला?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना स्ट्रेनमुळे 3 गोष्टीत धोका वाढला आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा विषाणू अतिशय जलदगतीनं दुसऱ्या विषाणूचं रुप घेतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, कोरोना विषाणूच्या त्या भागात बदल होत आहेत, जे भाग संक्रमण पसरवण्यात अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, कोरोना विषाणूच्या काही म्युटेशनमध्ये मानवांना संक्रमित करण्याची क्षमता वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच हा नवा कोरोना विषाणू आधीपेक्षा शक्तीशाली आणि जलद गतीनं पसरणारा असल्याचं सांगितलं जातंय.

म्युटेट होणं म्हणजे काय?

म्युटेट होणं म्हणजे विषाणूच्या जेनेटिक मटेरिअलमध्ये होणारे सततचे बदल. कोरोना विषाणूत शास्त्रज्ञांना हजारो म्युटेशन सापडले आहेत. हे म्युटेशन वायरसच्या स्पाईक म्हणजेच त्याच्या काट्याच्या आकारातील रचनेत हा लपलेले असतात. हेच स्पाईक मानवी कोशिकांवर चिटकतात, आणि त्यातून हा विषाणू आपला प्रसार करतो.

कोरोना विषाणूने याआधीही रुपं बदलली आहेत?

याआधीही कोरोनाच्या विषाणूनं अनेक रुपं बदलली आहेत. आधी चीनच्या वुहानमध्ये सापडलेला कोरोना विषाणू हा आता जगभरात सापडणाऱ्या कोरोना विषाणूहून भिन्न आहे. D614G प्रकारातला विषाणू फेब्रुवारी महिन्यात युरोपात सापडला होता. आता जगभरात याच प्रकारचा कोरोना विषाणूच सर्वात जास्त सापडतो. A222V हा एक प्रकारचा कोरोना विषाणू आहे, जो युरोपातच सापडला, हा त्या लोकांमध्ये सर्वाधिक सापडला, जे स्पेनमध्ये उन्हाळ्याची सुट्टीची मजा घेण्यासाठी गेले होते.

आता प्रश्न येतो ब्रिटनमध्ये हा प्रकार आला कुठून?

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना स्ट्रेन हा कोरोनाचा बदललेला प्रकार अशा रुग्णांच्या शरीरात बदलला, ज्याची प्रतिकारशक्ती अतिशय कमी होती. ज्यामुळे हा विषाणू जिवंत राहिला. रुग्णाची प्रतिकारशक्ती त्याला संपवू शकली नाही. आणि त्यानं तिथंच रुप बदललं आणि पुन्हा संक्रमणाला सुरुवात केली. (Everything to know about New coronavirus strain in UK)

या कोरोना स्ट्रेनमुळे परिस्थिती अधिक धोकादायक होईल?

सध्यातरी याचं कुठलंही प्रमाण नाही, मात्र यावर बारीक लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. याचं संक्रमणाचं प्रमाणं अधिक असल्यानं पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची लाट येईल. रुग्णालयं पुन्हा अपुरी पडू लागतील. आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीत अनेकांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागण्याची भीती वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या या नवीन प्रकारावर लस प्रभावी ठरणार?

ही गोष्ट आता निश्चित आहे की कोरोना लसीचा प्रभाव या कोरोना विषाणूवर नक्की होणार. ब्रिटनमध्ये सध्या ज्या 3 लसी दिल्या जात आहेत, या लसींमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे जरी कोरोनानं रुप बदललं तरी ती नव्या कोरोना विषाणूवर हल्ला करते, आणि त्याला संपवते. भारतातही सीरमची लस या विषाणूला संपवण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

पण यामध्ये एक धोका आहे…

जर या विषाणूला म्युटेट होऊ दिलं, तर चिंता वाढू शकते. कारण, सध्या हा विषाणू लसीपासून वाचण्याच्या परिस्थितीत पोहचत आहे. लसीपासून वाचण्यासाठी विषाणू आपलं रुप बदलतो. त्यामुळे लस ही विषाणूवर प्रभावी ठरत नाही. आणि विषाणू आपलं संक्रमणाचं काम सुरु ठेवतो. त्यामुळेच आताचा कोरोनाचा स्ट्रेन अतिशय चिंतेची गोष्ट मानली जात आहे. जर कोरोनाने असे म्युटेन बनवले, की ज्यामुळे लस त्यावर प्रभावी ठरणार नाही. तर परिस्थिती गंभीर होईल, आणि त्यानंतर जगभरात फ्ल्यूसारखी परिस्थिती तयार होईल अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, सध्या एक चांगली गोष्ट ही की, सध्या ज्या लसी आहेत, त्यामध्ये कोरोनानं बदललेल्या रुपानुसार तातडीनं बदल करणं शक्य आहे. त्यामुळे विषाणूचा खात्मा करणं सोपं होईल असं लस निर्माते सांगत आहेत.

 पाहा व्हिडीओ :


संबंधित बातम्या :

नव्या कोरोना लसीचा धसका?, थांबा..! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बघा, निर्णय घ्या!

कोरोनाच्या नव्या घातक प्रजातीवर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, युरोपीय देशांना विशेष सूचना

(Everything to know about New coronavirus strain in UK)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI