एका मृतदेहामुळे पुन्हा युद्ध भडकणार? इस्रायल चवताळला, हमासला ही छोटी चुक भोवणार?
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता थांबले आहे. असे असतानाच आता एका मृतदेहामुळे आता पुन्हा एकदा हे युद्ध भडकते की काय अशी भीती व्यक्तक केली जात आहे.

Israel Hhamas War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबवण्यात आले. ठरलेल्या शांतता करारानुसार आता हमास आणि इस्रायल यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका केली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना यश आल्याचे म्हटले जात असतानाच आता एक अजब बाब समोर आली आहे. हमासने एक चुकीचा मृतदेह दिल्यामुळे इस्रायलने आता संताप व्यक्त केला आहे. याच कारणामुळे आता इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध पुन्हा भडकते की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
इस्रायल आमि हमासने 20 कलमी शांतता करारावर सही करण्यास सहमती दाखवल्यानंतर याच करारातील तरतुदीनुसार इस्रायलने ओलीस ठेवलेल्या पॅलेस्टिनी तर हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका केली. सोबतच ओलीस ठेवलेल्या काही नागरिकांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचा मृतदेह परत करण्याचेही याच करारात ठरले होते. ठरल्यानुसार हमासने ओलीस असलेल्या काही इस्रायली नागरिकांचे मृतदेह इस्रायलला परतही केले आहेत. मात्र एका मतृतदेहामुळे इस्रायलने संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हमासने दिलेला एक मृतदेह ओलीस असलेल्या कोणत्याही इस्रायली नागरिकाशी जुळत नसल्याचे समोर आले आहे.
फॉरेन्सिक टीमने चाचणी केली आणि…
म्हणजेच हमासने इस्रायलला दिलेला मृतदेह हा ओलीस असलेल्या इस्रायली नागरिकाचा नाहीये. इस्रायलच्या फॉरेन्सिक विभागाने हमासने दिलेल्या मृतदेहांची तपासणी केली आहे. याच तपासणीतून संबंधित मृतदेह हा हमासकडे कधीकाळी ओलीस असलेल्या एकाही व्यक्तीच्या माहितीशी जुळत नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतरच इस्रायलने संताप व्यक्त केला असून हमासने ओलीस असलेल्या लोकांचे मृतदेह देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नेतान्याहूंचा इशारा, युद्ध पुन्हा पेटणार?
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी हमासने शांतता करारातील सर्व नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आम्ही यावर कोणतीही तडजोड करणार नाही. ओलीस ठेवलेल्या शेवटच्या इस्रायली नागरिकाला परत आणेपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवू, असेही नेतान्याहू यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता इस्रायलने अशी भूमिका घेतल्यामुळे गाझा पट्टीत पुन्हा एकदा युद्ध पेटणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
