भारत सर्वात मोठ्या संकटात, होर्मुझनंतर आता हा मार्गही…पेट्रोल, डिझेलचा भाव वाढण्याची भीती!

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतापुढे अगोदरच मोठे संकट उभे ठाकलेले आहे. असे असतानाच आता बाब अल मंदेब सामुद्रधुनीमुळे भारताची आणखी मोठी अडचण होऊ शकते. हुथी बंडखोरांमुळे ही अडचण आणखी वाढू शकते.

भारत सर्वात मोठ्या संकटात, होर्मुझनंतर आता हा मार्गही...पेट्रोल, डिझेलचा भाव वाढण्याची भीती!
bab al mandeb
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 31, 2026 | 3:25 PM

Bab al Mandeb Strait : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक व्यापार साखळी विस्कळीत झाली आहे. भारतासह चीन तसेच अन्य देशांना कच्चे तले आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा जाणवत आहे. एवढेच नव्हे तर या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात पट्रोल, डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली असून गॅस सिलिंडरची किंमतही वाढली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता भविष्यात भारताचं टेन्शन आणखी वाढण्याची शक्यता आहे. या युद्धात हुथी बंडखोरांनी उडी घेतल्यानंतर आता होर्मुझच्या सामुद्रधुनीनंतर आता आणखी एक महत्त्वाचा सागरी मार्ग बंद होतो की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

आता बाब अल मंदेब मार्ग बंद होणार?

येमेनमधील हुथी बंडखोरांनी इराणच्या युद्धात उडी घेतली आहे. या हुथी बंडखोरांना इराणचे समर्थन असते. त्यामुळेच हुथी बंडखोरांनी येमेनजवळ असलेला हा जलमार्ग बंद केला तर भविष्यात भारतापुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते. फक्त भारतच नव्हे तर युरोपातील देशांनाही मोठा फटका बसू शकतो. यामुळे जगाची अर्थव्यवस्थाच कोलमडू शकते.

बाल अल मंदेब जलमार्ग काय आहे?

बाब अल मंंदेब हा जलमार्ग येमेन देशाजवळ आहे. बाब अल मंदेब हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ अश्रूंचा दरवाजा असा होतो. बाब अल मंदेब ही समुद्रधुनी लाल सागर आणि अदनची खाडी आणि हिंद महासागर यांना जोडते. सामुद्रधुनीचा हा भाग साधारण 100 किमी लांब आणि 30 किमी रुंद आहे. ही सामुद्रधुनी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. युरोपात जाणारी आणि येणारी जहाजे हे याच मार्गाने जातात. जगातील एकूण व्यापारापैकीसाधारण 10 ते 12 टक्के तेल आणि नैसर्गिक वायू याच मार्गाने जातो.

भारतावर काय संकट येणार?

दरम्यान, भारतासाठीदेखील हा समुद्र मार्ग खूपच महत्त्वाचा आहे. कारण भारत आपल्या उर्जेच्या गरजेपैकी बराच कच्चा माल याच मार्गाने आयात करतो. या मार्गावर एखादा अडथळा निर्माण झाला तर भारतात तेल आणिन नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होईल. परिणामी भविष्यात पट्रोल, डिझेलची किंमत आणखी वाढू शकते. भारताच्या व्यापारावरही नकारात्मक प्रभाव पडेल. कारण हा मार्ग आशिया-युरोपला जोण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

Follow Us