Sam Pitroda : पाकिस्तानमध्ये गेल्यावर घरात असल्यासारखं वाटतं.. सॅम पित्रोदांच्या विधानामुळे चर्चा,
Sam Pitroda News : भारताने पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळशी चर्चा करण्याची गरज आहे. तरच संबंध सुधारतील. पित्रोदा यांच्या मते, पाकिस्तान त्यांना घरासारखे वाटते. सॅम पित्रोदा यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे .

काँग्रेस ओव्हरसीज विभागाचे प्रमुख आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ माजली असून नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. ‘पाकिस्तामध्ये असल्यावर मला घरात असल्यासारखं वाटतं’ असं पित्रोदा म्हणाले आहेत. त्यांवी एक व्हिडीओ जारी करून त्याद्वारे हे विधान केलं आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण संबंध असतानाच पित्रोदा यांचं हे विधान आलं आहे, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकतं.
भारताने पाकिस्तानशी संवाद साधून नातं सुधारलं पाहिजे, असं मत पित्रोदा यांनी मांडलं,आपल्या परराष्ट्र धोरणाचं लक्ष हे शेजारील राष्ट्रांवर असावं. मी जेव्हा पाकिस्तानला गेलो, तेव्हा मली घरी असल्यासारखं वाटलं. इतर कोणत्या देशात, परदेशात आलोय असं मला वाटतंच नाही, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानावरून भाजपाने जोरदार टीका केली आहे.
भारताने जेव्हा पाकिस्तानशी संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हाच पित्रोदा यांचा सल्ला आला आहे. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर यानंतर पाकिस्तानने वारंवार प्रयत्न करूनही, भारताने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
नेपाळ, बांगलादेशबद्दलही केलं विधान
पित्रोदा यांनी फक्त पाकिस्तानबद्दलच नव्हे तर बांगलादेश, नेपाळबद्दलही वक्तव्य केलं आहे. मी बांगलादेशमध्ये राहिलोय, आणि नेपाळमध्येही, तिथेही मला घरात असल्यासारखंच वाटतं. नेपाळ आणि बांगलादेशशीही संबंध सुधारण्याची गरज आहे असंही पित्रोदा म्हणाले. तुमच्या परिसरात सर्वकाही ठीक असेल तरच परराष्ट्र धोरण यशस्वी मानले जाते असं काँग्रेसच्या ओव्हरसीज विभागाचे प्रमुख म्हणाले.
चीन हा भारताचा शत्रू नाही असे या वर्षाच्या सुरुवातीलाच सॅम पित्रोदा यांनीम्हटले होते. या विधानामुळे राजकीय गोंधळ उडाला. काँग्रेस पक्षाने पित्रोदा यांच्या विधानापासून स्वतःला दूर ठेवलं होतं.
भाजपाने घेरलं
दरम्यान पित्रोदा यांनी पाकिस्तानबद्दल केलेल्या या विधानानंतर भाजपाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘ राहुल गांधी यांचे आवडते आणि काँग्रेसचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख सॅम पित्रोदा म्हणतात की त्यांना पाकिस्तानमध्ये ‘घरी असल्यासारखे वाटलं. 26/11 नंतरही यूपीएने पाकिस्तानविरुद्ध कोणतीही कडक कारवाई केली नाही यात काहीच आश्चर्य नाही. पाकिस्तानचा आवडता, काँग्रेसचा पसंतीचा.’ असं भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले.
Rahul Gandhi’s blue-eyed boy & Congress Overseas chief Sam Pitroda says he ‘felt at home’ in Pakistan.
No wonder UPA took no tough action against Pak even after 26/11.
Pakistan’s favourite, Congress’s chosen! pic.twitter.com/To5PEMbVQI
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) September 19, 2025
6 वर्ष, 6 विवादास्पद विधानं
2019 सालापासून सॅम पित्रोदांनी सहा वादग्रस्त विधाने केली आहेत. काँग्रेसने त्यांच्यावर एकदा कारवाईही केली होती, परंतु पित्रोदा यांची वादग्रस्त विधानं अजूनही सुरूच आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये पित्रोदांनी बालाकोट हवाई हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.तर या वर्षी एप्रिलमध्ये पित्रोदा यांनी शीख दंगलींबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते, “जर दंगली झाल्या असतील तर त्या झाल्या.”
तर मे 2024मध्ये वर्णद्वेषी टिप्पणी केली होती, त्यानंतर पक्षाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. तथापि, नंतर त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पित्रोदा यांना काँग्रेस पक्षात आणले होते, त्यामुळे ते गांधी कुटुंबाचे जवळचे मानले जातात.
