पाकिस्तानवर हल्ला झाला तर नॉर्थ ईस्ट भारताचा ताबा घ्या, बांग्लादेश सरकारला या अधिकाऱ्याचा सल्ला
भारतासोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने देशात भारतीय गाण्यांच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. यानंतर, गुरुवारी पाकिस्तानी एफएम रेडिओ स्टेशन्सनी भारतीय कलाकार आणि गायकांच्या गाण्याचे प्रसारण बंद केले आहे.

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याने आता भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. या संदर्भात आता बांग्लादेशातील अंतरिम सरकारशी जवळीक असलेल्या निवृत्त आर्मी ऑफिसरने गरळ ओकली आहे. जर पाकिस्तानवर हल्ला करण्याचे दु:साहस भारताने केले तर बांगलादेशने थेट नॉर्थ ईस्ट भारताचा ताबा घ्यावा अशी दर्पोक्ती केली आहे.
काश्मीरच्या पहलगाम येथे अमरनाथ यात्रेला महिना उरला असताना अतिरेक्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारात २२ एप्रिल रोजी २६ पर्यटक ठार झाले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानला धडा शिकविण्याच्या इराद्याने भारताने सिंधु नदी करार रद्द करण्यासारखे ५ मोठे स्ट्रेटजिक निर्णय घेऊन पाकिस्तानला अडचणीत आणले आहे. त्यातच आता पाकव्याप्त काश्मिरवर हल्ला करुन अतिरेक्यांचे प्रशिक्षण तळ उध्दवस्त करण्याचा मनोदय भारताने व्यक्त केला आहे. त्यातच आता पाकिस्तानवर हल्ला झाला तर बांगलादेशने नॉर्थ ईस्ट भारताचा ताबा घ्यावा असा सल्ला बांगलादेशच्या एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने दिला आहे.
बांगलादेश रायफलचे माजी प्रमुख असलेले मेजर जनरल ( निवृत्त ) आलम फझलुर रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत बांगलादेशच्या अंतरिम सरकारला हा सल्ला दिला आहे. त्यांनी चायना सोबत बांगलादेशने संयुक्त सैनिक प्रशिक्षण सुरु करावे असेही म्हटले आहे. उत्तर पूर्व भागात विषेश करुन अरुणाचल प्रदेशात आधीच पाकिस्तानच्या मदतीने चीनने अनेक पुल, धरणं आणि रेल्वे मार्ग बांधले आहेत. साऊथ आशिया समुद्रात आपले अस्तित्व वाढविण्यासाठी चीनने आधीच पाकिस्तान बरोबर करार केले आहेत.
बांगलादेशची सावध प्रतिक्रीया
मेजर जनरल ( निवृत्त ) आलम फझलुर रहमान यांच्या इंडियावर मिलीटरी एक्शन घेण्याच्या सल्ल्यापासून बांगलादेश सरकारने फारकत घेतली आहे. या संदर्भात बांगलादेशाने नरो वा कुंजराओ अशी भूमिका घेतली आहे. बांगलादेश सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आणि स्वातंत्र्याचा आदर करतो आणि इतरांकडूनही अशीच अपेक्षा करतो. मेजर जनरल फजलुर रहमान यांनी केलेली पोस्ट ही त्यांची वैयक्तिक टिप्पणी आहे. त्यासंदर्भात बांगलादेश सरकारला ओढू नका, असे आम्ही सर्वांना आवाहन करतो,” असे बांगलादेश मुख्य सल्लागार कार्यालयाचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
